मुंबईतील अंधेरी येथील स्नेहसदन या बेघर मुलांसाठीच्या निवारा गृहातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये सुमारे 40 मुलांना बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी, वेळेच्या व्यवस्थापनाचे तंत्र, तणाव व्यवस्थापनाचे तंत्र याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.
या सत्रात परीक्षेदरम्यान काय करावे व काय करू नये यासंदर्भात मार्गदर्शन केले गेले. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचणे आणि परीक्षा केंद्रावर कोणत्या वस्तू सोबत बाळगण्याची परवानगी आहे हे समजून घेणे, यांसारख्या संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासंदर्भात योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना नकाशे उत्तम प्रकारे लक्षात ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आणि त्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये योजनाबद्ध उत्तरांची रचना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यासोबतच परीक्षेत पूर्ण गुण मिळवण्याच्या शक्यतेत वाढ करण्यासाठी सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्लाही देण्यात आला. टार्गेट पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि रीच एज्युकेशन अॅक्शन प्रोग्रामने मिळून हा उपक्रम आयोजित केला होता.