दहावीची फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशाची स्वतंत्र फेरी

 दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऑनलाइन प्रवेशाची स्वतंत्र फेरी राबविण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने अद्याप दहावी, बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही. हा निकाल ऑगस्टअखेरीस लागण्याची शक्यता आहे. फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या आतापर्यंत नियमित आणि विशेष अशा मिळून एकूण सहा फेऱया पार पडल्या असून चौथी विशेष फेरीची गुणवत्ता यादी उद्या सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 31 ऑगस्ट, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या दरम्यान इनहाऊस, अल्पसंख्याक आणि बायफोकल शाखेचे प्रवेशही सुरू राहणार आहेत.