अवती भवती – अन्नदाता

>> सुहास मळेकर

भटारखान्यात कमरेला फडका गुंडाळलेला नि पोट सुटलेला उघडाबंब, मधूनच खांद्यावरचा मळका कपडा ओढून त्याला चलाखीने हात पुसून पुन्हा तो खांद्यावर टाकून कालथ्याने मोठे पातेले घुसळून काढणारा घामाने डबडबलेला तरी कुतूहलमिश्रित काwतुक असलेला आचारी खाणावळीतून, मंडप-मांडवातूनच काय आता चित्र आणि चित्रफितींतूनसुद्धा गायब झाला आहे. पूर्वी लोकांना विशेषतः भुकेलेल्यांना, खवय्यांना मनसोक्त आणि चविष्ट खायला घालता यावे अशी त्यांची मायाळू, ममताळू आणि दिलदार मानसिकता असे. प्रत्यक्ष त्याच्या हातून वाढलेले जेवायची संधी विरळाच तरी पण ती सोनेरी संधी मला पुष्कळदा लाभली आहे. एखादा पदार्थ रुचकर लागला तर आपल्या तोंडून आपसूकच ‘वाह्’ निघाले की, त्याचा समाधानाने फुललेला चेहरा बघण्याची संधी मी कधी सोडलेली नाही.

अजूनही जेवण झाल्यावर समाधानी चेहरा घेऊन मांडवातल्या पडद्यामागच्या त्या कलाकारांना भेटून ‘खूप छान झालंय हं जेवण’ हे सांगितल्याशिवाय मी उत्सव स्थळापासून फारकत घेत नाही.
अन्न शिजवणाऱया प्रत्येकाला वाटत असते की, आपल्या हातचे लोकांनी भरभरून चवीचवीने खावे. मग ते घरी मायेने बनविणारा किंवा बनविणारी असो, हॉटेल-खाणावळीत पैसे देऊन असो की सार्वजनिक ठिकाणी उत्सवात…ते करणाऱयाच्या हातात तो गोडवा उतरलेला असे आणि आपण म्हणत असू, ‘त्याच्या हाताला चव आहे.’
आता ही ममताळू आचारी-खानसाम्यांची जमात नष्ट होत चालली आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. अपवादाने असलीच तर त्यांची ती मानसिकता तशीच राहिली असेल का, अशी उगाच मनात पाल चुकचुकते. हॉटेल-खाणावळीतून, बाहेर खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरून काहीबाही नवनव्या अभद्र गोष्टी ऐकायला मिळतात.
अलीकडे जेवणात काहीही कृत्रिम बनविलेले पदार्थसुद्धा मिसळले जातात. त्यामुळे सार्वजनिक स्थळी असलेल्या स्वयंपाकघरातल्या त्या भिंतीआड बंद खोलीत काय काय रहस्ये दडलेली आहेत, आजकाल कोणी सांगू शकत नाही. त्या गोष्टी खऱया असतील-नसतीलही, पण अशा गोष्टींचा जन्म का आणि कुठून होतो याचासुद्धा विचार व्हायला नको का?
मातृप्रेमाने खाऊ घालणारे अन्नदाते काळाच्या पडद्याआड गेले. आता आपणच ‘काय खावे काय नको’ ठरवून आपली काळजी घ्यावी.