लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी! सुप्रिया सुळेंचे बंडखोरांना तडाखे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांवर जबरदस्त टीका केली. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी दासू वैद्य यांनी त्यांच्यावर केलेल्या कवितेपासून केली. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी! अशी ती कविता होती. ही कविता सुप्रिया यांनी ऐकवून दाखवताच, सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. वडिलांना घरी बसाचं म्हणायचं आणि आशिर्वाद द्या असं म्हणायचं मग तुमच्यापेक्षा आम्ही मुली परवडल्या हो, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासह सगळ्या बंडखोरांवर टीका केली. अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की आता शरद पवार यांनी थांबलं पाहिजे आणि नव्या लोकांना संधी दिली पाहिजे. त्यांच्या याच विधानावर सुप्रिया यांनी ही टीका केली आहे.

आई-वडील आजारी पडतात तेव्हा हॉस्पीटलमध्ये कोण नेतं ? वाईट वाटतं तेव्हा पहिले हात धरायला कोण येतात? मुली येतात. जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते तेव्हा वडिलांसोबत लेक उभी राहते. वडिलांना घरी बसाचं म्हणायचं आणि आशिर्वाद द्या असं म्हणायचं मग आम्ही मुली परवडल्या हो असं म्हणताना सुप्रिया सुळे यांनी नव्या जिद्दीने पक्ष पुन्हा बांधू असा निश्चय यावेळी केला. ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा, चिन्ह हे ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील. लोकं काहीही म्हणत असतील तर त्याकडे लक्ष देऊ नका असे सुप्रिया यांनी म्हटले. सत्तेने सुख मिळत नाही, तो एक भ्रम आहे असं म्हणतानाच त्या म्हणाल्या की, 8-9 खुर्च्या मोकळ्या झाल्यात , तिथे नवीन लोकांना बसायला संधी निर्माण झाली आहे. सुप्रिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे या निमित्ताने एक मागणीही केली. महिलांना पक्षातून 33 टक्के आरक्षण का द्यावे अशी विनंती सुप्रिया यांनी केली.