बहुप्रतिक्षित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चा मराठी ट्रेलर प्रदर्शित

मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट भोगणारे महान क्रांतिकारक आणि साहित्यिक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अतिशय विलक्षण तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले राष्ट्रभक्त, देशाविषयी जाज्वल्य अभिमान असणारे स्वातंत्र्यसेनानी, अनेक समाजसुधारणांसाठी पुढाकार घेणारे सुधारक, आपल्या अमोघ शैलीने देशप्रेम जागवणारे साहित्यिक अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ओळख सांगितली जाते. स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी घेतलेली ती ऐतिहासिक उडी आणि अंदमानमधील हाल अपेष्टा यांना मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी लवकरच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट झळकणार आहे.

नुकताच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले, त्याच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारणारे रणदीप हुड्डा यांच्यासह चित्रपटाची टीम उपस्थित होती. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, लिजण्ड स्टुडिओज, अवाक फिल्म्स आणि रणदीप हुड्डा फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट झी स्टुडिओजच्या सहकार्याने प्रदर्शित होणार आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटाचे झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, योगेश राहार आणि रणदीप हुड्डा निर्माते असून रूपा पंडित, सॅम खान, अन्वर अली, पांचाली चक्रवर्ती सहनिर्माते आहेत. तर या चित्रपटची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अंकिता लोखंडे यांनी सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीरांना आदरांजली वाहण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा बायोपिक हुतात्मा दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 22 मार्चला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.