सुपरकॉप ‘खाकी’चा प्रवास

>> तरंग वैद्य

एक धडाडीचे तडफदार इन्स्पेक्टर अविनाश मिश्रा, ज्यांनी 2019 मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त होण्याआधी 150 कुप्रसिद्ध गुंड आणि माफियांचा एन्काऊंटर करून खात्मा केला. म्हणूनच त्यांना आदराने एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि सुपरकॉप म्हणूनही संबोधले जाते. इन्स्पेक्टर अविनाश मिश्रा यांच्या कारकीर्दीवर बेतलेली ‘इन्स्पेक्टर अविनाश’ ही वेब सीरिज ‘खाकी’ला मान द्या हेच सांगते.

उ त्तर प्रदेशाच्या इतिहासात 1990 ते 2015 हा काळ बाहुबलींचा काळ, गुंडांच्या मुजोर मस्तीचा काळ म्हणून गणला जाऊ शकतो. साधारण 1993 च्या काळात उत्तर प्रदेशमध्ये प्रकाश शुक्ला या कुप्रसिद्ध गुंडाचे वर्चस्व होते. दिवसागणिक त्याची हिंमत वाढतच चालली होती. रोज एक नवीन घटना घडत होती आणि उत्तर प्रदेश शासन मूक प्रेक्षक म्हणून बघत होते, हतबल होते. शेवटचा उपाय म्हणून सरकारने ‘स्पेशल टास्क फोर्स’द्वारे या गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. याच विषयावर आधारित ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये सरकार ‘स्पेशल टास्क फोर्स’द्वारे या गुन्हेगारीला आळा घालण्याचा कुशल आणि हुशार पोलीस अधिकाऱयांची एक टीम बनवते. ज्यांचे एकच लक्ष्य असते ‘गुन्हेगारीवर आळा घालणे.’ या दलाचे नेतृत्व इन्स्पेक्टर अविनाशकडे सोपवले जाते. त्यामुळे या वेब सीरिजचे नाव आहे ‘इन्स्पेक्टर अविनाश.’ 18 मे, 2023 पासून जिओ सिनेमावर ही वेब सीरिज दाखवली जात आहे. साधारण 40 मिनिटांचे आठ भाग आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये अविनाश मिश्रा नावाच्या इन्स्पेक्टरच्या काम करण्याच्या पद्धतीवर या मालिकेची कथा बेतलेली आहे. आपण बऱयाच सिनेमात बघितले आहे, एक इन्स्पेक्टर आहे जो आपल्या नोकरीशी समर्पित आहे, कामात कुठलीही तडजोड करीत नाही, गुन्हेगारांना जागीच ठार करून तिथल्या तिथे न्याय करतो. ही सिनेमाची वाटणारी काल्पनिक कथा इन्स्पेक्टर अविनाश मिश्राचे वास्तव आहे. 2019 मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त होण्याआधी अविनाश यांनी 150 कुप्रसिद्ध गुंड आणि माफियांचा एन्काऊंटर करून खात्मा केला आहे. म्हणूनच त्यांना आदराने एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि सुपरकॉप म्हणूनही संबोधले जाते.
कथा काही नवीन नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची संवेदनशील बातमी समजते. याचा छडा लावण्यासाठी आणि वाढत्या गुंडागर्दीला आळा घालण्यासाठी ते ‘स्पेशल टास्क फोर्स’ तयार करतात. प्रकाश शुक्ला व इतर कुप्रसिद्ध गुंडांना चकमकीत मारून समाजातला कचरा साफ करण्यात येतो तो इन्स्पेक्टर अविनाशच्या नेतृत्वाखाली.

कथेचा सगळा डोलारा अर्थातच अविनाश म्हणजे रणवीर हुडाच्या खांद्यावर आहे. एका प्रशिक्षित पोलीस अधिकाऱयाप्रमाणे त्याचे खांदे मजबूत आहेत हे त्याने दाखवून दिले आहे. एक तडफदार, बेफिकीर, पण जबाबदार इन्स्पेक्टर त्याने छान उभा केला आहे. अपराध्यांना शिक्षा देताना त्याच्या चेहऱयावरचा राग, त्याची देहबोली त्याला वाहवाह मिळवून देते. ‘हमारे तो खून में ही खाकी है’ हा त्याचा संवाद त्याला टाळय़ांनी साथ देतो. उर्वशी रौतेला अविनाशच्या बायकोच्या भूमिकेत आहे. छान दिसणे आणि नवऱयाची वाट बघत बसणे या पलीकडे तिला काम नाही. झाकीर हुसेन गृहमंत्री झालेत. ते मर्यादित काळासाठीच दिसतात, पण आपली छाप सोडून जातात. अभिमन्यू सिंगचा देवी हा खलनायक मालिकेत फोडणीचे काम करतो. त्यामुळे मालिकेतील रोमांच वाढतो. तसेच अमित सियालचे राजकारण बघताना त्याचा राग येतो.
मालिकेतील काही प्रसंग – अयोध्येत बॉम्ब ठेवल्याची बातमी आणि मग तो शोधून निक्रिय करण्यासाठी पोलिसांनी प्राणांची पर्वा न करता केलेली धडपड मन जिंकून घेते. दिग्दर्शकाने हा प्रसंग अशा पद्धतीने चित्रित केला आहे की, शेवटपर्यंत उत्कंठा कायम राहते आणि बॉम्ब निकामी झाल्यावर आपल्याला हायसे वाटते. असाच आणखी एक प्रसंग म्हणजे कानपूरमध्ये तीन महिलांचा बलात्कार झाल्यावर दोषींना शोधून त्यांना इन्स्पेक्टर अविनाश फासावर लटकवतो. तेव्हा त्या महिलांच्या चेहऱयावरील आनंद बघून आपल्यालाही बरे वाटते. गुन्हेगारांना शिक्षा देण्याची ही पद्धत चुकीची आहे हे माहीत असूनही प्रेक्षक जेव्हा अविनाशच्या कृतीचे समर्थन करतात तेव्हा समजायचे की हा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्याचा विजय आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्टवर मालिका असल्यावर गोळीबार, मारामारी, पाठलाग असणारच. या ढिशुम ढिशुम प्रसंगातील रोमांच कायम ठेवल्याचे श्रेय अॅक्शन डायरेक्टरला जाते.

गुन्हेगार आणि राजकारण एकत्र आले की, अपराध कुठल्या थराला जातो याचे ज्वलंत चित्रण या मालिकेत दाखवले आहे. त्यामुळे बघताना चीड येणे स्वाभाविक आहे. या वेब सीरिजमध्ये पोलिसांचा पक्ष ही दाखवला आहे. स्वतसाठी व परिवारासाठी वेळ देऊ न शकणे, सतत आपल्या आणि आपल्या परिवारावर हल्ल्याची भीती घेऊन जगणे सोपे काम नसून अतिशय हिमतीचे काम आहे. आपण बऱयाच वेळा पोलिसांना तो मान देत नाही जो दिला पाहिजे हे आपल्याला ही मालिका बघताना जाणवते. एक धडाडीचे तडफदार इन्स्पेक्टर अविनाश मिश्रा यांच्या कारकीर्दीवर बेतलेली ही वेब सीरिज अवश्य बघा आणि नेहमीच ‘खाकी’ला मान द्या.

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)

[email protected]