चंद्रभागातीरी वैष्णवांची मांदियाळी

‘अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर’ या संतोक्तीची प्रचीती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवार (दि. 23) रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. 65 एकर, मठ, मंदिरे, धार्मिक संस्थाने उपनगरीय भाग, दर्शन रांग भरून गेली आहे. 4 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाल्यामुळे पंढरीनगरी भाविकांनी दुमदुमली आहे.

दरम्यान, श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा गुरुवारी पहाटे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते 2.30 ते 3 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. त्यानंतर 3 ते 3.30 वाजेपर्यंत रुक्मिणी मातेची पुजा करण्यात येणार आहे, उपमुख्यमंत्री बुधवारी सायंकाळीच पंढरीत दाखल झाले आहेत.

लाखो भाविक, विविध संतांच्या दिंड्यांसमवेत मजल दरमजल करत पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांच्या उपस्थितीने चंद्रभागा वाळवंट फुलून गेले आहे. तसेच 65 एकर पालखी तळ, दर्शन रांग व उपनगरीय भाग गजबजला आहे. दर्शन रांग गोपाळपुर रोडवर पोहोचली आहे. दर्शन रांगेत 2 लाखांवर भाविक उपस्थित आहेत. एका मिनिटाला साधारणपणे 40 भाविकांना दर्शन मिळत आहे. तर दर्शन रांगेतील भाविकांना 10 ते 12 तासांत दर्शन मिळत आहे.

भाविकांना स्नान करता यावे म्हणून चंद्रभागेत मुबलक पाणी सोडण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून जीवरक्षक दल तैनात करण्यात आले आहे. 4500 पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात आले आहे. तर ३०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, नगरपालिका प्रशासन, मंदिर समिती यांच्या वतीने आरोग्यविषयक सेवा बजावण्यात येत आहेत.

श्री विठ्ठल मंदिर ५ टन फुलांची आरास

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठ्ल-रुक्मिणी मंदिरात देवाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यातआला आहे. यासाठी 5 टन फुले मागवण्यात आली असून, रंगीबेरंगी पानाफुलांनी मंदिरामध्ये नेत्रदिपक अशी आरास केली जाणार आहे. पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी ही सजावट ‘श्रींचरणी अर्पण केली आहे.

जनावरांचा बाजार फुलला

वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखीतळावर कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा जनावरांचा बाजार भरला आहे. दशमीला बुधवारी सायंकाळपर्यंत ३ हजारांहून अधिक जनावरे बाजारात दाखल झालेली आहेत. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने यंदा जनावरांचे १२ डॉक्टर बाजारतळावर तैनात केलेले आहेत. तीन वर्षांनंतर प्रथमच कार्तिकी यात्रेत जनावरांचा बाजार भरला असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती यांनी सांगितले की, “कार्तिकी यात्रेकरिता आलेले भाविक पदस्पर्श दर्शन घेण्यास उत्सुक असतात. त्यामुळे दर्शन रांगेत उभे राहत आहेत. दर्शन रांगदेखील मंदिरापासून पुढे पत्राशेडमध्ये व पत्राशेडमधून पुढे गोपाळपूर रोडवर दाखल झाली आहे. वॉटरप्रूफ दर्शन रांगेत भाविकांसाठी फॅन, कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चार दिवस मोफत अन्नदानही सुरू करण्यात आले आहे.