मालमत्ता कर सात दिवसांत भरा; अन्यथा जप्ती-दंडाची कारवाई

मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी 21 दिवसांची मुदत देऊनही तब्बल 326 कोटींची थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱया मेट्रोच्या पाच कंत्राटदारांना पालिकेने चांगलाच दणका दिला आहे. थकीत मालमत्ता कर सात दिवसांत भरा अन्यथा जप्ती किंवा दंडाच्या कारवाईला तयार रहा, असा इशाराच पालिका प्रशासनाकडून थकबाकीदारांना देण्यात आला आहे.

मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱया पाच कंत्राटदारांना पालिकेने मार्च 2024 मध्ये नोटीस जारी करत 21 दिवसांच्या आत करभरणा करण्यास यापूर्वी कळवले होते. मात्र या कालावधीत कंत्राटदारांनी करभरणा न केल्यामुळे आता सात दिवसांची अंतिम नोटीस जारी करण्यात आली आहे. पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याची अंतिम मुदत 25 मे 2024 आहे. मालमत्ताधारकांनी विहित मुदतीत मालमत्ता कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अशी आहे थकबाकी

मेसर्स एचसीसी-एमएमएस – 86 कोटी 84 लाख 05 हजार 693 रुपये

मेसर्स सीईसी-आयटीडी – 84 कोटी 40 लाख 83 हजार 77 रुपये

मेसर्स डोगस सोमा – 83 कोटी 23 लाख 67 हजार 405 रुपये

मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही – 70 कोटी 50 लाख 41 हजार 906 रुपये

मेसर्स एचसीसी-एमएमएस – 1 कोटी 23 लाख 71 हजार 765 रुपये

अशी झाली कारवाई, हे आहेत कंत्राटदार

मुंबई महानगरामध्ये मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पेरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) वतीने मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे सुरू आहेत. यासाठी एमएमआरसीलकडून मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही, मेसर्स डोगस सोमा, मेसर्स एचसीसी-एमएमएस-1, मेसर्स एचसीसी-एमएमएस-2 या कंत्राटदार कंपन्यांना मेट्रोचे काम करण्यासाठी वडाळा ट्रकतळ, भूकर क्रमांक 8 टप्पा 2 आणि 3 या ठिकाणी कास्टिंग यार्डसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

‘एमएमआरसीएल’ आणि या कंत्राटदारांमध्ये झालेल्या करारानुसार भूखंडाच्या वापरासंबंधीचे मालमत्ता कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. या पाचही कंत्राटदारांकडे मिळून 326 कोटी 22 लाख 69 हजार 846 रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. वारंवार सूचना देऊनही यापैकी चार कंत्राटदारांनी आर्थिक वर्ष 2016-17 पासून अद्यापपर्यंत करभरणा केलेला नाही. तर, एचसीसी-एमएमसी या कंत्राटदाराकडे 2010-11 पासून थकबाकी आहे.