मराठी-हिंदी काव्य, गीतातून अवतरणार ‘कौसल्येचा राम’, शिवाजी मंदिरमध्ये रविवारी प्रयोग

अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभारल्याचे औचित्य साधून ‘ओंकार साधना’ या संस्थेने ‘कौसल्येचा राम’ हा अनोखा कार्यक्रम साकारला आहे. मराठी, हिंदी कविता तसेच गीतांमधून प्रभू रामचंद्रांची विविध रूपे ‘कुटुंब रंगलंय काव्यात’चे सादरकर्ते प्रा. विसुभाऊ बापट सादर करणार आहेत. शुभारंभाचा प्रयोग रविवार 10 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 वाजता शिवाजी मंदिरमध्ये होणार असून यानिमित्ताने कविता व गाण्यांमधून ‘कौसल्येचा राम’ अवतरणार आाहे.

‘कौसल्येचा राम’ या कार्यक्रमाच्या शुभारंभाचा प्रयोग होईल. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यपाल राम नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती उमा बापट यांनी केली असून त्यात मेघा प्रभुदेसाई (गायिका व हार्मेनियम), अर्चना दिनेश (गायिका), रोहित प्रभुदेसाई (तबला व गायक), तालवाद्य – डॉ. किशोर खुशाले आणि प्रा. विसुभाऊ बापट यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचे निरूपण उमा बापट करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणून नितीन सावंत, विजय सूर्यवंशी हे काम पाहात आहेत. या भक्तिमय सांगीतिक राम नामघोषाच्या कार्यक्रमाला अधिकाधिक रामभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निर्मात्या उमा बापट यांनी केले आहे.