अभिषेक घोसाळकर यांच्या आठवणींनी दहिसरकर गहिवरले; शोकसभेत विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली

कोणतेही संकट असो किंवा कोणतीही अडचण… कोणतेही आढेवेढे न घेता नागरिकांच्या मदतीसाठी अहोरात्र झटणारे, सुख-दुःखात सहभागी होणारे आणि राजकीय कारकीर्दीत विकासकामांचा धडाका घालून मतदारांच्या मनात घर केलेले दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या आठवणींनी आज दहिसरकर अक्षरशः गहिवरून गेले. अभिषेक यांची धोकेबाजीतून हत्या झाल्यामुळे घोसाळकर कुटुंबीयांसह दहिसरकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या शोकसभेप्रसंगी रहिवाशांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा 8 फेब्रुवारी झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घोसाळकर कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला. अभिषेक यांच्यावर 9 फेब्रुवारी रोजी शोकाकुल वातावरणात हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर घोसाळकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रातून नागरिक, लोकप्रतिनिधी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज बोरिवली पश्चिम कच्छी ग्राऊंड, योगी नगर, न्यू लिंक रोड येथे आयोजित शोकसभेत हजारोंच्या संख्येने रहिवासी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अभिषेक यांचे वडील आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, आई वैभवी, अभिषेक यांच्या पत्नी तेजस्विनी तसेच सौरभ घोसाळकर आणि पूजा घोसाळकर उपस्थित होते. आपले वडील गेल्याने अभिषेक यांची 9 वर्षांची मुलगी यश्वी आणि 4 वर्षांची मुलगा सतेज यांच्या मनावरही मोठा आघात झाला आहे.

शोकसभेला शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, राजन विचारे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, आमदार विलास पोतनीस, उपनेते अमोल कीर्तिकर, शिवसेना प्रवक्ता संजना घाडी, डॉ. शुभा राऊळ, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री प्रकाश मेहता, विभागप्रमुख उदेश पाटेकर, अजित भंडारी, सुजाता शिंगाडे, संध्या दोशी, रिद्धी खुरसुंगे, संजय घाडी, बाळकृष्ण ब्रीद, हर्षद कारकर, माधुरी भोईर, सुजाता पाटेकर, माजी आमदार श्याम सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, पालिका, पोलीस अधिकारी, व्यापारी उपस्थित होते.