अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार, डोकं ठेचून मारायचा प्रयत्न; 17 वर्षांचा आरोपी ताब्यात

बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर आरोपीने या मुलीचे दगडाने डोके ठेचून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे वय हे 17 वर्षे इतके असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. नांदुरा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला या मुलीवर बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र नंतर तिला अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुरुवारी ही मुलगी गायब झाल्याने घाबरलेल्या घरच्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. आरोपी हा पीडितेच्या जवळच राहातो आणि काही लोकांनी या मुलीला आरोपीसोबत पाहिलं होतं. मुलीच्या नातेनाईकांना या ही मुलगी रस्त्याच्या कडेला पडलेली सापडली होती. या मुलीच्या डोक्यावर मोठी जखम होती, ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून काढत ताब्यात घेतलं. चॉकलेटचं आमीष दाखवून आपण या मुलीला पळवून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला अशी कबुली आरोपीने दिली आहे.