भाजपच्या नतद्रष्ट राजवटीची होळी करावीच लागेल, उद्धव ठाकरेंचे फटकारे

होळीला दुसऱ्याच्या घरचं सामान चोरून न्यायचं आणि त्याच्याच नावाने बोंबा मारायच्या हा भाजपचा शिमगा आहे. भाजपच्या या दहा वर्षांच्या नतद्रष्ट राजवटीची होळी आपल्याला करावीच लागेल, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर फटकारे ओढले.

मिरज येथे झालेल्या जनसंवाद सभेत त्यांनी भाजपच्या औरंगजेबी वृत्तीवर ठाकरे शैलीत घणाघात केला. ते म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांना साजेल अशी विराट सभा बऱ्याच वर्षांनी मिरजेत होतेय. शिवसेनाप्रमुखांनी रोवलेल्या बीजांचा आज महावृक्ष झालेला आहे. कारण, शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची जी बीजं महाराष्ट्रभर पेरली ती भाजपसारखी बोगस बियाणं नव्हती. कारण भाजप, संघाला इतकी वर्षं झाली तरी यांच्या बीजाला अंकुरच फुटत नाहीयेत. सगळी बाहेरून माणसं घ्यावी लागत आहेत. थोडक्यात भाजपची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झाली आहे.’

‘आता होळीचा सण आहे, तेव्हा आपण घरात नको असलेलं साहित्य घराबाहेर ठेवतो. मग होळी करणारे ते चोरून नेतात, तशीच भाजपची आज अवस्था झाली आहे. न्यायचं आमचं सामान, त्यावर होळी पेटवायची आणि बोंबा आमच्याच नावाने मारायच्या, हा यांचा शिमगा आहे. त्यांनी जरी शिमगा करायचा ठरवला तरी आपण भाजपच्या दहा वर्षांच्या नतद्रष्ट राजवटीची होळी आपल्याला करावीच लागेल. म्हणून मी सांगलीत आलो आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

मिंध्यांच्या पत्रकार परिषदेवरही त्यांनी आसुड ओढले. ‘इथे येण्यापूर्वी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद घेऊन दम दिल्याचं कळलं. ते त्यांच्या आमदारांना म्हणाले की याद राखा, तुमच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. मी म्हणतो की तुम्ही कितीही काहीही केलंत तरी या निवडणुकीत तुम्ही पराभूत होणार म्हणजे होणारच. सगळ्यांच्या कुंडल्या घेतल्यात, 40 पोपट सोबत आहेत. मग कुठल्यातरी झाडाखाली बसून कुडमुड्या ज्योतिषी म्हणून धंदा सुरू करा. कारण तेच करावं लागणार आहे’

शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो, त्याच खोलीत मला दिलेलं वचन अमित शहांनी मोडलं आणि वर मला खोटं ठरवायला निघाले. म्हणून मी संतापलो आणि मैदानात उतरलो. कारण, हे आमचं हिंदुत्व नाही. औरंगजेबाच्या भूमीत जन्मलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायला जाऊ नये, आम्ही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्मलो आहोत. ही भूमी वीरांना जन्म देणारी आणि गद्दारांना माती चारणारी आहे. तुम्ही ही गद्दारी छत्रपतींच्या महाराष्ट्राशी केलेली आहे. माझ्यावर घराणेशाहीची टीका करता. मला अभिमान आहे की मी हिंदुहृदयसम्राट आणि माझी मां यांचा पुत्र आहे, याचा मला अभिमान आहे. मोदी आणि अमित शहांनी आपल्या सात पिढ्यांचा इतिहास सांगावा. मी माझ्या पिढ्यांचा इतिहास सांगतो. मी काल औरंगजेबी वृत्तीवर बोललो तर मोदी लगेच म्हणाले की मुझे औरंगजेब कहा, मेरा शिरच्छेद करने के लिये कहा.. मोदीजी मी इतक्या खालच्या दर्जाचा नाही. मी कधीही तुमचा शिरच्छेद करा असं बोललेलो नाही. कारण ते माझे संस्कार नाहीत. मी पुन्हा सांगतो की तुम्ही जर माझा महाराष्ट्र लुबाडायचा प्रयत्न कराल तर त्या औरंगजेबी वृत्तीला आम्ही महाराष्ट्रात मूठमाती दिल्याशिवाय राहणार नाही, याचा मी पुनरुच्चार करतो, असे फटकारेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी मारले.

‘हा सगळा वीराचा, शुरांचा, मर्दांचा इलाका आहे. इथे पराक्रम शिकवावा लागत नाही. इथे गवताच्या पात्यांचेही भाले होतात. पण, इथे दुहीचं बीज खडकावर नुसतं टाकलं तरी ते फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. हेच त्या औरंगजेबाने ओळखलं होतं. तोडा फोडा आणि राज्य करा हीच ती औरंगजेबी वृत्ती आहे. हे आमचं हिंदुत्व नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली देश नासवणारा हा भाडोत्री जनता पक्ष आहे. त्यांचं हिंदुत्व आम्ही मानत नाही. तुम्ही ठरवा कोणतं हिंदुत्व तुम्हाला हवं आहे, असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थितांना केला.

‘मी माणूस बघून जबाबदारी देतो. माझी खात्री आहे की, जो माणूस मातीत कुस्ती खेळून जिंकतो, तो मातीशी इमानच राखेल, मातीशी कधीच बेईमानी करणार नाही. आज मी चंद्रहारची उमेदवारी जाहीर करतोय, शिवसेनेच्या मशालीवर चंद्रहार तिथे निवडून जाणार आहे. हा मर्द तुमच्यासाठी उतरला आहे, पण याला जिंकवून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्हीही मर्द आहोत. या चंद्रहारची गदा तुम्ही आहात. चंद्रहार तुझी अस्सल गदा समोर आहे, ती जोवर तुझ्यासोबत आहे, तोवर कशाचीही चिंता करू नको.’ असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.