ज्या हातांनी दिल्लीच्या तख्तावर बसवलं तेच हात आता खाली खेचतील, उद्धव ठाकरे मोदींवर कडाडले

माझ्या शिवसेनेला आज मोदी नकली सेना म्हणताहेत. शिवसैनिकांनी ज्या हातांनी तुम्हाला दिल्लीच्या तख्तावर बसवलं तेच हात आता तुम्हाला खाली खेचतील, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. वर्धा येथील महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आपले माननीय पंतप्रधान वर्ध्याला आले होते, असं म्हणतात आणि एक अभंग म्हणून गेले. कारण चैत्री एकादशी होती. त्यामुळे त्यांनी अभंग म्हटला, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी, कोणी त्यांना लिहून दिला होता माहीत नाही. पण, हा माझ्या समोर बसलेला माझा विठ्ठल, हे त्याचं रूप आहे आणि मोदीजी हे रूप बघा आणि त्याचं सुख आधी बघा, तुमचं सुख नंतर बघा. दहा वर्षं तुमच्या सुखासाठी झटलो आणि पदरात धोंडे पडले. अनिल देशमुख, संजय सिंग यांनी आपले अनुभव सांगितले. मी यांच्याविरुद्ध का उभा राहिलो? गद्दारांना खोके मिळाले. मी गेलो असतो तर मला किती मिळाले असते. पण मला खोके नको आहेत. हे समोर दिसतंय ते माझं वैभव आहे, ते माझं ऐश्वर्य आहे. मोदीजी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यावर जीएसटी लागू होऊ शकत नाही. आजपर्यंत तुम्ही अनेक अत्यंत वाईट प्रकाराने राजकारण केलंत. आतापर्यंत देशात कधीही असं वातावरण निर्माण नव्हतं झालं, जे आज तुम्ही केलं आहे. मी धर्माचा प्रचार करत नाही, पण ज्याला तुम्ही हिंदुत्व म्हणताय, ते आणि भारत देश तुम्ही संपूर्ण जगात बदनाम करून टाकला आहे. ज्या पद्धतीने तुम्ही एकेकाला तुरुंगात टाकताय, त्यावरून जगामध्ये देशाची बदनामी झाली. संपूर्ण देशात सुरू असलेली जुलूमशाही, घटना बदलण्याची तयारी सुरू आहे, मग आम्ही काय नाकर्त्याप्रमाणे बघत बसणार. मी आजवर कधी वर्ध्याला आलो नव्हतो कारण आम्ही इथून लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. ही जागा मित्रपक्षाला दिली होती. आज मी पुन्हा मित्रपक्षालाच जागा दिली आहे. पण त्याला विजयी करण्यासाठी स्वतः वर्ध्याला आलो आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे मी नेहमी सांगतो की आम्हाल कधीकाळी असं वाटत होतं की देश मजबूत करायला एका पक्षाचं सरकार पाहिजे. पण, आता मीच तुम्हाला सांगतोय की आता देशात एका पक्षाचं आणि एका व्यक्तिचं सरकार येऊ द्यायचं नाही. कारण, संमिश्र सरकारं होती त्यावेळी अटलजी, नरसिंह जी आणि मनमोहन सिंग यांनी उत्तम सरकार चालवलं. त्याच काळात देश पुढे गेला आणि तुम्ही आम्हाला सांगताय, घराणेशाहीवर बोंबलताय. अमित शहा म्हणाले की उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं, म्हणून त्यांनी भाजपशी युती तोडली. अहो, अमित शहा, जर माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तर ही जनता करेल, तुमच्या आशीर्वादाची गरज नाही. पण मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्ष पद नाही. त्यासाठी निवडणूक घ्यावी लागते, अशी सणसणीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेशी गद्दारी झालेली आहे, पक्षाचं नाव आणि चिन्ह मोदी आणि शहांनी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून गद्दारांना दिलेलं आहे. आज मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे. याच वर्ध्यात नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंची सेना ही नकली सेना आहे. आता इथे जे शिवसैनिक आहेत, याच हातांनी तुम्हाला दिल्लीचं तख्त दाखवलं होतं, हेच हात आता तुम्हाला त्या तख्तावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत. जो महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही, ही बाळासाहेबांची शिकवण घेऊन मी पुढे चाललो आहे. हे सगळे रामाचं नाव घेऊन मतांची भीक मागत आहेत. आम्हीही जय श्री राम म्हणतो, बजरंगबली की जय म्हणतो. पण ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी कर्नाटकात आणि अमित शहांनी मध्य प्रदेशमध्ये प्रचार केला, तसा प्रचार आम्ही केलेला नाही. आम्ही आमच्या कामाच्या जोरावर मत मागतो. काल यांचा महाराष्ट्र द्वेष दिसून आला. तुम्ही उद्धव ठाकरे, शरद पवार यांना संपवायला निघालात. पण तुम्ही आता आमच्या दैवतांच्या नावांनाही पुसायला निघालात. माझ्या मशाल गीतातली जय भवानी ही घोषणा आहे. तुम्हाला माझ्या भवानी मातेबद्दल एवढा आकस? असं हे महाराष्ट्र द्वेषी सरकार खाली खेचावच लागेल, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.