मोदीभक्तांनो, तुम्ही देशभक्त नाही काय? भाजपच्या टोळधाडीला उद्धव ठाकरे यांचा सवाल

भाजप हा काय पक्ष आहे का? काही नीतिमत्ता, विचार वगैरे काही शिल्लक राहिले आहे का? शासकीय यंत्रणांचा राजरोस वापर करून खंडण्या वसूल करणारी टोळी म्हणजे भाजप! भाजपमध्ये हिंमत असेल तर शासकीय यंत्रणांची कवचकुंडले बाजूला काढून निवडणुकीच्या मैदानात उतरावे.

मराठवाड्यात पुन्हा एकदा जनसंवादाचे भगवे तुफान घेऊन आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मोदीभक्तांची जबरदस्त सालटी काढली. मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत भाषणाची सुरुवात ‘माझ्या देशभक्त बांधवांनो…’ अशी केल्यामुळे मी हिंदुत्व सोडले अशी बांग भाजपच्या पिलावळीने ठोकली आहे. मात्र मोदीभक्तांना माझा सवाल आहे, ‘देशभक्ती’ या शब्दाचे तुम्हाला वावडे आहे काय? तुम्ही देशभक्त नाही काय? अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदीभक्तांवर कडाडून हल्ला चढवला. हे हिंदुत्ववादी आहेत, देशासाठी काहीतरी करतील असे आम्हाला वाटले होते, पण शासकीय यंत्रणांना राजरोस हाताशी धरून खंडण्या वसूल करणारी टोळी म्हणजे भाजप, असा भीमटोलाच उद्धव ठाकरे यांनी लगावला.

हिंगोली जिल्ह्यात आज जनसंवादाचे भगवे तुफान आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसमत, सेनगाव येथे जनसामान्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, परभणीचे खासदार संजय जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख आदींची उपस्थिती होती.

मोदीभक्तांना देशभक्तीचे वावडे आहे का?

मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत भाषणाची सुरुवात ‘माझ्या देशभक्त बांधवांनो…’ अशी केल्यामुळे भाजपचे खुळखुळे वाजायला सुरुवात झाली. मी हिंदुत्व सोडले अशी काव काव भाजपवाले करत आहेत. त्याचा समाचार घेत उद्धव ठाकरे कडाडले, मोदीभक्तांना काय देशभक्ती या शब्दाचे वावडे आहे काय? मोदीभक्त देशभक्त नाहीत काय? भाजप हिंदुत्ववादी आहे असा आपला समज होता. त्याच समजातून अनेक वर्षे आम्ही सोबत होतो. परंतु ही तर शासकीय यंत्रणांना हाताशी धरून खंडण्या वसूल करणारी टोळी आहे! हा कसला आलाय पक्ष? काही नीतिमत्ता, काही विचार राहिलाय का यांच्यात शिल्लक? असा भीमटोलाच उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आता सच्चे दिन येणार

अच्छे दिनाचे गाजर दाखवून भाजपने २०१४ मध्ये सत्ता मिळवली. सत्ता मिळवली, पण देशासाठी यांनी काही केले नाही. सत्यपाल मलिक यांनी पुलवामाबद्दल खळबळजनक खुलासा केला. त्यावर या भाजपवाल्यांचे दाभाड बसले. देशाचे रक्षण करणार्‍या जवानांना कोणतेही संरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे या जवानांना नाहक आपला जीव गमावावा लागला. ही जबाबदारी मोदी सरकारची होती. पण सरकारने मलिकांनाच गप्प बसवले. मलिक यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी का करण्यात आली नाही? त्यावर मिठाची गुळणी धरायची आणि धर्माधर्मात भांडणे लावून आपला मतलब साधायचा एवढेच भाजपने केले, अशी कठोर टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. अच्छे दिन सोडा, आता सच्चे दिन येणार आहेत. आपले सरकार येणार आहे, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अब की बार, भाजप तडीपार!

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. वर्षाला दोन कोटी नोकर्‍या देणार होते. काय काय करणार होते… काय झाले या सगळ्या आश्वासनांचे? हवेत विरली? शेतमालाला हमीभाव मिळत नाही. उत्पादन खर्च वाढला आहे, पण शेतकर्‍याच्या खिशात मात्र दमडी येत नाही. त्यामुळे ‘अब की बार, भाजप तडीपार!’ हा नारा आता गावागावात घुमला पाहिजे. आता आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे मोदी सरकारचे गुणगान करणारा रथ आला की अडवा! असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मैदानात या, बघा लोक हळद लावतात का!

संतांची भूमी असलेल्या या हिंगोलीत खासदार आणि आमदाराने गद्दारी केली. काय दिले नाही त्यांना? पण गेले. गद्दार गेले, पण निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहे. जिल्ह्यातील हळद संशोधन प्रकल्पाला मुख्यमंत्री असताना मी मंजुरी दिली. आता हे टिनपाट सांगतात, माझ्यामुळेच प्रकल्प आला म्हणून. या मैदानात, बघा… लोक हळद लावतात का तुम्हाला! गद्दारांनी उभेच राहावे, लोक त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

फडणवीसांना घरफोडीचा परवाना द्या

काल एका मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा आलो, दोन पक्ष फोडून’ अशा बाजारगप्पा मारल्या. फडणवीस यांच्या फुशारकीची उद्धव ठाकरे यांनी जोरदार चिरफाड केली. फडणवीस यांना आता घरफोडीचा परवानाच दिला पाहिजे. दोन पक्ष फोडून आले, येताना ‘आदर्श’वालेही सोबत घेतले. ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच सोबत घेतले, असा घाव उद्धव ठाकरे यांनी घातला.

खोटारडेपणाचा पर्दाफाश करा

हिंगोलीचा पालकमंत्री महिलेबद्दल अपशब्द काढतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून बसता, हेच तुमचे हिंदुत्व! आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. दहा वर्षात भाजपने लोकांना खोटी आश्वासने देण्यापलीकडे काही केले नाही. या खोटारडेपणाचा पर्दाफाश आता करण्याची वेळ आली आहे. जनतेच्या न्यायालयात यांचा पैâसला होणारच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.