भाजपच्या नतद्रष्ट राजवटीची होळी करावीच लागेल! मिरजेतील विराट सभेत उद्धव ठाकरे यांचा घणाघात

माझी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती आहे, जो चाप अजित पवारांना लावला तोच चाप मिंधेंनाही लावा. धनुष्यबाण चिन्हाखाली तात्पुरती निशाणी असे लिहायला सर्वोच्च न्यायालयाने आदेश द्यावे. न्यायसंस्थेवर आमचा विश्वास आहे, फक्त वेळेवर न्याय द्यावा.

शिवसेनाप्रमुखांनी जे बियाणे पेरले, बिज रोवले त्याचा महावृक्ष झाला आहे. भाजपसारखे आमचं बियाणं बोगस नाही. भाजपच्या बियाणाला अंकुरच फुटत नाही. त्यामुळे ते कचरा गोळा करत सुटलेत. आमचंच सामान चोरताहेत आणि त्याची होळी करून आमच्या नावे शिमगा करताहेत. मात्र, भाजपच्या नतद्रष्ट राजवटीची होळी करावीच लागेल. ती होळी केल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मिरजेत विराट सभेत केला.

सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज येथील कोळेकर मठाच्या  मैदानावर आज उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. सर्वत्र भगवे तुफान आले होते. या सभेत सांगली जिल्हय़ात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा झंझावात निर्माण केला. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, फडणवीस, मिंधे, भाजपचा खोटा प्रचार यावर जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत,  तेजस ठाकरे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, उपनेते नितीन बानगुडे-पाटील,  उपनेते, कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार वैभव नाईक, संजय विभुते, अभिजीत पाटील ,सिद्धार्थ जाधव, चंद्रकांत मैंदुरे, चंदन चव्हाण, बजरंग पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, दिगंबर जाधव. शाकिरा जमादार आदी उपस्थित होते.

सुरुवातीलाच विराट जनसमुदायाला साद घालताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी जे बीज रोवले, जे बियाणे पेरले त्याचा महावृक्ष झाल्याची ही साक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पुढच्या वर्षी 100 वर्षे होताहेत. मात्र, भाजपच्या बियाणाला अंकुरच फुटत नाही म्हणून ते इतर पक्षातील लोक भाजपात घेतात. शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फोडला आता ते कचरा गोळा करत सुटलेत. आमचच सामान चोरून होळी पेटवून आमच्याच नावाने शिमगा करताहेत. परंतु भाजपच्या 10 वर्षांच्या नतद्रष्ट  राजवटीची होळी या निवडणुकीत करावीच लागेल.

अरे घरफोडय़ा

फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले की, ‘मी पुन्हा आलो, दोन पक्षाला फोडून आलो.’ असा हा निर्लज्ज माणूस. अरे घरफोडय़ा, दुसऱयांच्या संपत्तीवर बसतो’, पक्ष आणि घर फोडणाऱया या व्यक्तीला मर्द कसे म्हणावे? हा फडणवीस हे निर्लज्जम सदासुखी माणूस आहे, असा जोरदार समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.

मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान

‘गुजरातला उद्योग नेताय त्याला आमचा विरोध नाही. पण सगळं काही गुजरातकडेच नेताय. मोदी तुम्ही गुजरातचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहात हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र लुबाडला जातोय आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री दिल्लीचे बूट चाटताहेत. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणारच, तेव्हा मी सुडबुद्धीने वागणार नाही. कोणत्याही राज्यावर अन्याय होऊ देणार नाही,’ असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

‘सर्वोच्च न्यायालयाने बांबू लावला आहे. अजित पवारांच्या पक्षाला सांगितले आहे की, चिन्हाचा वापर करताना त्याखाली ठळकपणे सूचना लिहावी लागेल की ही तात्पुरती निशाणी आहे. जसा सिगारेटच्या पाकिटावर, दारूच्या बाटलीवर आरोग्यास धोकादायक असा वैधानिक इशारा दिला जातो तसाच हा प्रकार आहे. ज्या निकषावर लबाडाने राहुल नार्वेकर लवादाने माझ्या शिवसेनेबद्दल निर्णय देताना आमचे धनुष्यबाण चिन्ह चोरांच्या म्हणजेच मिंधेंच्या हाती दिले. माझी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती आहे, जो  चाप अजित पवारांना लावला तोच चाप मिंधेंनाही लावा. धनुष्यबाण चिन्हाखाली तात्पुरती निशाणी असे लिहायला सर्वोच्च न्यायालयाने आदेश द्यावे. न्यायसंस्थेवर आमचा विश्वास आहे फक्त वेळेवर न्याय द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

वसंतदादा आणि शिवसेनाप्रमुखांचे ऋणानुबंध

सभास्थानी येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. याचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरे म्हणाले, वसंतदादा आणि शिवसेनाप्रमुखांचे ऋणानुबंध होते. शरद पवारांबरोबर शिवसेनाप्रमुखांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. विचारात मतभेद होते, मतभिन्नता होती, पण कटुता नव्हती. शिवसेनेने कधी सुडाचे राजकारण केले नाही आणि काँग्रेसही कधी सूडभावनेने वागली नाही. मात्र, नरेंद्र मोदी आल्यापासून सुडाचे राजकारण सुरू झाले आहे.

गद्दारांचा पराभव होणारच

गद्दारांनी महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी केली. मातीशी म्हणजे मातेशी ते बेईमान झाले. त्यांना भस्म्या रोग झाला. किती दिलं तरी ते खातात. खाऊन खाऊन त्यांना अपचन झाले. ईडी, आयटीची रेड पडणार म्हणून ते तिकडे गेले. या निवडणुकीत गद्दारांचा पराभव होणार म्हणजे होणारच, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

सांगली…अब की बार…चंद्रहार!

‘त्यांच्याकडे डबल इंजिन असले तरी आमच्याकडे डबल महाराष्ट्र केसरी आहे. लोकसभेच्या मैदानात पैलवान चंद्रहार पाटील लढणार आणि जिंकणार… हा ‘डबल महाराष्ट्र केसरी’ एका हातात मशाल घेऊन दिल्लीच्या संसद भवनात गेल्याशिवाय राहणार नाही, याची गॅरंटी शिवसेनेची. मात्र त्यासाठी तुमची साथ हवी आहे,’ असे आवाहन शिवसेना  नेते, खासदार संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत म्हणाले, ‘आम्ही लाल मातीत कुस्ती गाजविणाऱया एका शेतकऱयाच्या मुलाला लोकसभेच्या उमेदवारीची संधी देत आहोत. लोकसभेत पाठवून द्यायची जबाबदारी तुम्ही घ्या. पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी आज आणखी एक शुभशकुन आहे. आजची सभा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तेजस ठाकरे आले आहेत. ते सहसा सभांना जात नाहीत आणि शिवसेना दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे. सध्या राज्यात व देशात एकच आवाज घुमतो आहे आणि तो आहे शिवसेनेचा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा. आज मोदींना फक्त उद्धव ठाकरेंची भीती वाटते. मोदी व शहा देशाची लोकशाही धोक्यात आणू पाहत आहेत,’ असे संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी, औरंगजेब आणि महंमद अली जीना या तिघांचाही जन्म गुजरातमध्ये झाला असून नरेंद्र मोदी हे औरंगजेब वृत्तीचे आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

40 पोपट घेऊन झाडाखाली बस

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री मिंधेंचे अक्षरशः वाभाडेच काढले. ‘आत्ताच वाचले की, मिंधेने आमदारांना दम दिला म्हणे, सर्वांच्या कुंडल्या आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता  मिधेंचा पराभव करणारच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणतेही काम शिल्लक
राहणार नाही. या कुरमुडय़ा ज्योतिषाकडे 40 पोपट आहेत. 40 पोपट घेऊन झाडाखाली कितीही कुंडल्या बघत बस. दाढी वाढवलीच आहे तर ती आणखी वाढवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंधेंची खिल्ली उडवली.

औरंगजेबी वृत्तीला मूठमाती देणारच

सिंदखेडराजा येथे मी औरंगजेबी वृत्तीबाबत बोललो तर लगेच पंतप्रधान मोदींनी कुभांड रचले. मोदी म्हणाले, बघा माझा शिरच्छेद करा म्हणताहेत. निवडणुका आल्या की त्यांचा केविलवाणा चेहरा होतो आणि निवडणुका झाल्या की सब पे भारी. मग आता त्यांच्या छातीला पिन का लागली? पण मी जे काल बोलतो ते आज पुन्हा या जनतेसमोर सांगतो. जर तुम्ही महाराष्ट्र ओरबाडत असाल, लुटत असाल तर हा महाराष्ट्र औरंगजेबी वृत्तीला मूठमाती दिल्याशिवाय राहणार नाही. मी काय चुकीचे बोललो, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित

जनसागराच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. जो माणूस मातीत खेळतो तो मातीशी व मातेशी बेइमानी करणार नाही. चंद्रहारची गदा ही जनता आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टाळय़ांचा कडकडाट झाला.