युनिकॉर्न कंपन्यांचा फुगा फुटला

हिंदुस्थानात गेल्या चार वर्षांत युनिकॉर्न कंपन्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 च्या माहितीनुसार, हिंदुस्थानात आता केवळ 67 युनिकॉर्न कंपन्या उरल्या आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 68 होता. जगभरातील युनिकॉर्न संख्येच्या यादीत हिंदुस्थान तिसऱया नंबरवर कायम आहे. सर्वात जास्त युनिकॉर्न कंपन्या अमेरिकेत आहेत. या कंपन्यांची संख्या 703 आहे. अमेरिकेत या वर्षी 37 नव्या कंपन्या जोडल्या आहेत. दुसऱया नंबरवर चीन असून या ठिकाणी 340 युनिकॉर्न कंपन्या आहेत. चीनमध्येही 24 कंपन्या जोडल्या गेल्या आहेत.

बायजूज यादीतून बाहेर
वर्षभरापूर्वी 22 बिलियन डॉलरच्या व्हॅल्यूएशनची एडूटेक कंपनी बायजूज आता या यादीतून बाहेर पडली आहे. बायजूजचे व्हॅल्यूएशन एक अब्ज डॉलरहून कमी झाले आहे. जगातील कोणत्याही स्टार्टअप व्हॅल्यूएशनमधील सर्वात मोठी घसरण आहे.

ड्रीम 11 आणि स्विगी टॉप इंडियन युनिकॉर्न
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आणि फँटेसी स्पोर्टस् कंपनी ड्रीम 11 हिंदुस्थानातील सर्वात जास्त व्हॅल्यूएशनचे स्टार्टअप आहेत. दोन्हींचे व्हॅल्यूएशन 8 बिलियन
डॉलर आहे. यानंतर रेजरपेचा नंबर आहे. याचे व्हॅल्यूएशन 7.5 बिलियन डॉलर आहे. स्विगी आणि ड्रीम 11 जागतिक यादीत 83 व्या नंबरवर आहे, तर रेजरपे 94 व्या नंबरवर आहे.

टॉप तीन कंपन्या बाईटडान्स कंपनी टॉपवर आहे. याचे व्हॅल्यूएशन 220 बिलियन डॉलर आहे. एलन मस्क यांची स्पेसएक्स 180 बिलियन डॉलरच्या व्हॅल्यूएशनसोबत दुसऱया नंबरवर तर मायक्रोसॉफ्टची ओपन एआय तिसऱया नंबरवर आहे.