राणीच्या बागेत पेंग्विनच्या बदल्यात येणार कोल्हा, मोर, मगर आणि कासव

penguins-7

सात वर्षांपूर्वी मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीबाग) दक्षिण कोरियामधून आठ हम्बोल्ट पेंग्विन आणले होते. आता सात वर्षांनी, भायखळा येथील हे प्राणीसंग्रहालय देशातील इतर प्राणीसंग्रहालयातील प्राणी पक्ष्यांसह जलचर पक्ष्यांची देवाणघेवाण करणार आहे. मुंबईच्या प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनची संख्या आता 15 वर पोहोचली आहे.

मुंबई प्राणीसंग्रहालयाने हैदराबाद प्राणिसंग्रहालयाला लिहिलेल्या पत्रात जास्त प्रमाणात असलेले प्राणी आणि पक्षी देवाणघेवाणीसाठी उपलब्ध आहेत असे लिहिले आहे. या यादीत मुंबई प्राणीसंग्रहालयाने एक नर आणि मादी पेंग्विनचा देखील उल्लेख केला आहे. त्या बदल्यात सोनेरी कोल्हा, काळे कासव, दलदलीतील मगर आणि मोर यांची देवाणघेवाण केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई प्राणीसंग्रहालयात सध्या 15 पेंग्विन आहेत, त्यापैकी 3 नर आणि पाच मादी पेंग्विन 26 जुलै 2016 रोजी दक्षिण कोरियातील कोएक्स एक्वेरियम, सोल येथून आणण्यात आले होते. आम्ही देशातील कोणत्याही प्राणीसंग्रहालयासोबत आमचा विनिमय कार्यक्रम वाढवण्यास तयार आहेत. नेहरू प्राणिसंग्रहालयातील अतिरिक्त प्राण्यांची यादी मिळाल्यानंतर, त्यांनी त्यांच्याकडे असलेले प्राणी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त प्राण्यांच्या बदल्यात देवाणघेवाण कार्यक्रमासाठी प्रस्ताव ठेवला.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ संजय त्रिपाठी म्हणाले की, ते देवाणघेवाण करण्यासाठी देऊ करत असलेले सर्व प्राणी व पक्षी निरोगी आणि प्रजननक्षम वयाचे आहेत. संबंधित प्राणीसंग्रहालयात हे प्राणी, पक्षी ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा असतील तरच प्राण्यांची देवाणघेवाण होऊ शकते. पेंग्विनसाठी आमच्याकडे एअर हँडलिंग युनिट्स, स्वच्छ हवा परिसंचरण, चिलर, पेंग्विनच्या 24/7 निरीक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पशुवैद्य आणि अभियंते आहेत. या सर्व सुविधा प्राणीसंग्रहालयात असतील त्यांनाच आम्ही पेंग्विन एक्सचेंजसाठी देणार आहोत.”

भायखळा प्राणीसंग्रहालयाने एक्सचेंजसाठी सूचीबद्ध केलेले प्राणी व पक्षी पुढील प्रमाणे, रीसस मॅकॅक नर (4) आणि मादी (4), बार्किंग डीअर नर (2) आणि मादी (2), रानडुक्कर मादी (1), कॉकॅटियल ग्रे नर (3) आणि मादी (3), कॉकॅटियल व्हाइट नर (3) आणि मादी (3), पॅराकीट अलेक्झांड्रिन नर (2) आणि मादी (2).