विक्रोळीकरांना मिळणार सुपर स्पेशालिटी रुग्णालय; 13 मजली रुग्णालय, 21 मजली कर्मचारी वसाहत

अद्ययावत ऑपरेशन थिएटर, 500 बेड्स, 13 मजली रुग्णालय आणि 21 मजली कर्मचारी वसाहतींसह विक्रोळीत येत्या काही वर्षांत सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. म्हाडाने क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाला परवानगी दिल्यानंतर आता पालिकेने आज निविदा मागवल्या आहेत. यासाठी अंदाजे 593 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे विक्रोळी, कांजूर, भांडुप, पवईतील सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत.

विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये असलेले महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयांवर विक्रोळी, कांजूर, पवई आणि भांडुपमधील रहिवाशी वैद्यकीय सुविधेसाठी अवलंबून आहेत. मात्र या रुग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने हे रुग्णालय गेली 8 वर्षे बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. मुंबई महापालिकेने म्हाडाकडे पुनर्विकासासाठी पाठपुरावा केल्यानंतर आता म्हाडानेही परवानगी दिली आहे. आज काढलेल्या निविदांमधून कंत्राटदाराची नेमणूक केल्यास पुढील तीन ते चार वर्षांत विक्रोळीकरांना सुसज्ज असे सुपर स्पेशालिटी रुग्णालय मिळणार आहे.