मराठी माणसाच्या हक्कासाठी पार्लेकरांचे आज आंदोलन

मांसाहारी मराठी माणसांना इमारतींमध्ये घर नाकारणे, बिल्डरांकडून मराठी माणसांची होणारी अडवणूक यासह विविध प्रकारे मुंबईत मराठी माणसांची गळचेपी सुरू आहे. मात्र मतांच्या राजकारणात राज्य सरकार या महत्त्वाच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प आहे. त्याबाबत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांची आणि मुंबई, महाराष्ट्रासाठी आपल्या लेखणी आणि वाणीचा दांडपट्टा फिरवणारे ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक आचार्य अत्रे तसेच मुंबईत मराठी माणसांना ताठ मानेने जगण्यास शिकवलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या 23 डिसेंबर रोजी क्षमा मागण्याचे ‘पार्ले पंचम’ या संस्थेने ठरवले आहे.

मुंबईतील मराठी माणसांचा टक्का दिवसेंदिवस घसरत आहे. 107 हुतात्मांच्या असीम त्यागातून मुंबई मराठी माणसाला मिळाली, मात्र आपण तिचे रक्षण करू शकलेलो नाही. गेल्या काही वर्षांत मुंबईत जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच बहुतेक नवीन इमारतीत अलिशान घरे बांधण्याची पद्धत विकासकांनी विकसित केली आहे. त्यामुळे कोटय़वधी रुपये किंमत असणारी ही घरे सामान्य मराठी माणसाच्या आवाक्यात राहिलेली नाहीत. याबाबत ‘पार्ले पंचम’ या संस्थेने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या होत्या. मात्र त्यावर सरकार काहीच बोलण्यास तयार नाही. याची खंत व्यक्त करण्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारल्याचे ‘पार्ले पंचम’चे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांनी सांगितले.

घरविक्रीत मराठी माणसांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवा!
मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटून चालली आहे. नवीन इमारतीत घरांचे बुकिंग सुरू झाल्यानंतर एक वर्षापर्यंत मराठी माणसांसाठी घरांचे 50 टक्के आरक्षण ठेवावे. एक वर्षानंतर या घरांची खरेदी न झाल्यास बिल्डरला ते कोणालाही विकण्याची मुभा असावी. त्यामुळे जी मराठी माणसे आर्थिकदृष्टय़ा सक्षम असतील त्यांना त्यामुळे घर घेणे शक्य होईल तसेच मुंबईतील मराठी टक्का यातून टिकवून ठेवता येईल, अशी मागणी संस्थेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

उद्या 23 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, दुपारी 12 वाजता वरळी नाका येथील आचार्य अत्रे स्मारक तसेच दुपारी 12.30 वाजता फोर्ट येथील हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र वाहून क्षमायाचना करण्यात येणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई व मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे कार्याध्यक्ष रमेश सांगळेदेखील उपस्थित राहणार आहेत.