भाजप खासदारांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे

विदर्भात पहिल्या आणि दुसऱया टप्प्यात होणाऱया लोकसभेच्या 13 मतदारसंघांत भाजपच्या उतरलेल्या सहा आणि शिंदे गटाच्या खासदाराच्या संपत्तीने मागील पाच वर्षांत कोटीच्या कोटी उड्डाणे केली आहेत. यामध्ये नांदेडमधील भाजपचे खासदार प्रताप चिखलीकरांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांत तब्बल 117 टक्क्यांनी तर भाजपच्याच रामदास तडस यांच्या संपत्तीत 86 टक्के वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात विदर्भात पहिल्या आणि दुसऱया टप्प्यात अशा दोन टप्प्यांत 13 जागांवर लोकसभेसाठी निवडणूक होईल. यामध्ये भाजपने सात विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना संपत्तीचा तपशील सादर करावा लागतो. त्यातील माहितीवरून या खासदारांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. 2019 मध्ये या खासदारांची संपत्ती 130 कोटी 8 लाख रुपयांच्या आसपास होती, पण 2024 मध्ये या खासदारांची संपत्ती 199 कोटी 41 लाख रुपये झाली आहे. या खासदारांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांत सरासरी 53 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे.

खासदारकी फळफळली

2019 ते 2024 या पाच वर्षांच्या काळात खासदारांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होताना दिसते. सर्वधिक म्हणजे नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांच्या संपत्तीत तब्बल 117 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर भाजपचेच वर्ध्यातील खासदार रामदास तडस यांच्या संपत्तीत 68 टक्के तर भाजपचेच भंडारागोंदिया मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या संपत्तीत मागील पाच वर्षांत 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

मतदारसंघ                 खासदार               पक्ष            वर्ष 2019           वर्ष 2024

नांदेड                    प्रताप चिखलीकर         भाजप         5.22 कोटी         11.35 कोटी

वर्धा                     रामदास तडस              भाजप         6.58 कोटी         11.01 कोटी

भंडारा                   सुनील मेंढे                भाजप          62.75 कोटी      101.98 कोटी

बुलढाणा               प्रतापराव जाधव            शिंदे गट        11.23कोटी       15.88कोटी

गडचिरोली             अशोक नेते                भाजप         5.01कोटी          7.06 कोटी

नागपूर                नितीन गडकरी            भाजप          22.73 कोटी            28.03कोटी

अमरावती              नवनीत राणा             भाजप         12.45 कोटी       13.83 कोटी

 

पाच वर्षांत संपत्तीत वाढ टक्केवारीमध्ये

प्रताप चिखलीकर          117 टक्के

रामदास तडस   68 टक्के

सुनील मेंढे        63 टक्के

प्रतापराव जाधव      15.88 टक्के

अशोक नेते        41टक्के

नितीन गडकरी  23 टक्के

नवनीत राणा    13.83 टक्के