शिक्षण खात्याच्या बँक खात्यातून 47 लाखांची रक्कम लांबवली; मंत्रालयातल्या बँकेतील धक्कादायक प्रकार

बनावट चेक, बनावट सही, बनावट स्टँपचा वापर करून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार रुपयांची रक्कम लांबवल्याचा धक्कादायक प्रकार मंत्रालयाच्या आवारातील एका बँकेत घडला आहे. यापूर्वी असा प्रकार पर्यटन खात्यात घडला होता. त्यामुळे एखादी टोळी यामागे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून चार वेळा बनावट चेक, बनावट सही आणि बनावट स्टँपचा वापर करून ही रक्कम काढल्याचा प्रकार घडला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून काढलेली ही रक्कम नमिता बग, प्रमोद सिंग, तपकुमार व झिनत खातून या चार व्यक्तींच्या बँक खात्यात जमा झाले आहे.

या प्रकरणी मरीन लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे. यापूर्वीही असाच प्रकार घडल्याने पोलिसही चक्रावून गेले आहे. यावर शिक्षण विभागातील अधिकारीही गप्प आहे.

दोन घटनांमध्ये एकच कार्यपध्दती

यापूर्वी राज्याच्या पर्यटन विभागातून अशाच प्रकारे पैसे गायब झाले होते. तेव्हा पर्यटन खात्याच्या बँक खात्यातून 67 लाख रुपये लांबवण्यात आले होते. बँक खात्यातून पैसे गायब करण्याची कार्यपध्दती सारखीच आहे. त्यामुळे यामागे एखादी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण खाते व बँकेतील कर्मचा-यांनी हातमिळवणी करून हा पैसे गायब केल्याचा प्राथमिक संशय आहे. पण या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.