साहित्यिकांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करावे – राज ठाकरे

सध्याचे राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झाले असून कुठे काय घडेल याचा नेम नाही. मात्र लेखक व कवींना परमेश्वराने जी शब्दाची देणगी दिली आहे त्याचा वापर करणे गरजेचे असून मराठी साहित्यिकांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर परखडपणे भाष्य करावे, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचे असंग्रहीत साहित्य असलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज टिपटॉप प्लाझा येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. कुसुमाग्रजांची कविता ही कठोरपणे भाष्य करणारी असून ती राजकारण्यांना समजत नसेल तर सर्वसामान्य लोकांना तरी कळलीच पाहिजे, असे ते म्हणाले. या वेळी चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे, कवी अशोक बागवे, अरुण म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कुसुमाग्रज यांची गाजलेली ‘पन्नाशीची उमर गाठली’ ही कविता मंत्रालयात लावली असली तरी तिची जागा चुकली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.