ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनने शोधल्या दोन वैशिष्ट्यपूर्ण पाली, प्रसिद्ध चित्रकारावरून ठेवलं नाव

तेजस ठाकरे यांच्या ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनला आणखी दोन वैशिष्ट्यपूर्ण पालींचा शोध घेण्यात यश आलं आहे. महाराष्ट्राच्या उत्तर-पश्चिमी घाटामधून निमास्पिस कुळातील दोन पालींचा शोध ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने घेतला आहे. या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि डॉ. ईशान अगरवाल यांचा समावेश आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच याच कुळातील चार पालींचा शोधही ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने घेतला होता.

नव्याने शोध लागलेल्या पालींच्या वैशिष्ट्यपूर्ण गोल बुबुळांवरून त्यांचा समावेश निमास्पिस या कुळात केला आहे. यातील एका पालीचे नाव प्रसिद्ध डच चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग यांच्या नावावरून निमास्पिस व्हॅनगॉगी असं ठेवण्यात आलं आहे. कारण, या पालीच्या अंगावरील रात्रीच्या आकाशात चमचमणाऱ्या तारकांसारखी रंगसंगती आढळते. ही रंगसंगती व्हॅन गॉग यांच्या प्रसिद्ध द स्टारी नाईट या पेंटिंगसारखी असल्याने तिला हे नाव देण्यात आलं आहे.

तर दुसऱ्या पालीचं नाव निमास्पिस सातुरागिरीन्सिस असं ठेवण्यात आलं आहे. कारण या पाली सातुरागिरी डोंगररांगातच आढळतात. निमास्पिस कुळातील पाली त्यांच्या प्रदेशनिष्ठतेसाठी ओळखल्या जातात. त्यांचे आढळक्षेत्र छोटय़ा भूप्रदेशावरती विस्तारलेले असते. थंडाव्याच्या जागांशिवाय त्या तग धरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे आढळक्षेत्र मर्यादित अनुकूल जागांपुरतेच सीमित असते. निमास्पिस सातुरागिरीन्सिस या पाली श्रीविल्लीपुतुर जंगलांत प्रामुख्याने दिवसाच्या थंड वेळी खडक, झाडे किंवा मानवी वस्तीतील इमारतींवर आढळता. या पालींमध्ये नर आणि मादी यांच्या रंगात फरक आढळून येतो.