उचगावच्या त्रैवार्षिक यात्राकाळात वीजपुरवठा खंडित करू नका, शिवसेनेचे सहायक अभियंत्यांना निवेदन

करवीर तालुक्यातील उचगावात 19 ते 24 एप्रिल या त्रैवार्षिक यात्राकाळात वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सहायक अभियंता अमोल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

सध्या कडक उन्हाळा असल्याने विजेची मागणी अधिक आहे. त्यात उचगाव येथील त्रैवार्षिक यात्रेनिमित्त प्रसिद्ध मंगेश्वर मंदिरासह प्रत्येक घरावर विद्युत रोषणाई करण्यात येते. त्यामुळे लोड वाढून वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यासाठी अतिरिक्त वीजपुरवठय़ाची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी. कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर होणाऱया येथील यात्राकाळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन उचगाव येथील वीज वितरण कार्यालयातील सहायक अभियंता अमोल गायकवाड यांना देण्यात आले आहे.

यात्राकाळात ग्रामस्थ व भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन गायकवाड यांनी दिले. यावेळी दीपक रेडेकर, सुनील चौगुले, योगेश लोहार, शरद माळी, दत्ता फराकटे, अजित पाटील, आबा जाधव, बंडा पाटील, दादासा यादव आदी उपस्थित होते.