पोलिसाच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

पोलीस अंमलदाराच्या मुलीने राहत्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केल्याचा प्रकार भायखळा येथे घडला आहे. एका तरुणासह त्याच्या कुटुंबियांनी आपल्याबद्दल अपशब्द उच्चारल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे  मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये दोन ध्वनीचित्रफिती बनवून त्यात म्हटले आहे. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी त्या तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

भायखळा येथे राहणाऱया पोलीस अंमलदाराच्या 24 वर्षीय मुलीने सोमवारी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तिच्या मोबाईलची तपासणी केली. तेव्हा मोबाईलमध्ये तिने मृत्यूपूर्वी दोन दोन ध्वनिचित्रफीत तयार केल्याचे आढळून आले. त्यात तिने आपल्या मृत्यूला पराग नावाचा तरुण जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भायखळा पोलिसांनी परागविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.