अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. उमा सत्य साई गड्डे नंतर आता अमेरीकेत राहणारा हिंदुस्थानी विद्यार्थी अब्दुल अरफात याचा मृतदेह सापडला आहे. मागच्या महिन्यापासून बेपत्ता असलेला 25 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थी अमेरिकेतील क्लीव्हलँडमध्ये मृत अवस्थेत सापडला आहे. हैदराबादला राहणाऱ्या मोहम्मद अब्दुल अरफातच्या मृत्यूने अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे, यावर्षी 11 हिंदुस्थानी हिंदुस्थानी विद्यार्थ्यांसोबत ही घटना घडवी आहे.

न्यूयॉर्कमधील हिंदुस्थान वाणिज्य दूतावासाने अराफातच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे आणि ट्विटरवर पोस्ट लिहीली आहे, त्यात त्यांनी म्हंटले आहे की, “मोहम्मद अब्दुल अराफात, ज्याच्यासाठी शोध मोहीम सुरू होती, तो क्लीव्हलँड, ओहियो येथे मृतावस्थेत आढळून आल्याचे कळून दुःख झाले.” क्लीव्हलँड विद्यापीठातील विद्यार्थ्याच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी ते अमेरिकेतील स्थानिक एजन्सींच्या संपर्कात असल्याचे वाणिज्य दूतावासाने सांगितले. त्यांचे पार्थिव हिंदुस्थानात आणण्यासाठी आम्ही कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहोत.

मोहम्मद अब्दुल अराफात हा विद्यार्थी 7 मार्च 2024 पासून बेपत्ता होता. त्याचे वडील मोहम्मद सलीम यांनी सांगितले की, तो बेपत्ता झाल्यानंतर 10 दिवसांनी त्यांना फोन आला होता आणि फोन करणाऱ्याने त्यांचा मुलगा अब्दुल अराफात अपहरण झाल्याचे सांगितले होते. त्याला सोडण्यासाठी आरोपींनी 1200 अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागितली होती. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. अमेरिकेतील हिंदुस्थानी दूतावासाच्या मदतीने विद्यार्थ्याचा शोध घेतला जात होता, मात्र आता अचानक त्याचा मृतदेह सापडला आहे. अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची ही पहिली किंवा दुसरी घटना नाही. अशी प्रकरणे सातत्याने उजेडात येत आहेत. 6 एप्रिल रोजीही उमा सत्य साई गड्डे या हिंदुस्थानी विद्यार्थ्याच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले होते. तो क्लीव्हलँड, ओहायो येथून शिक्षण घेत होता. या वर्षात आतापर्यंत अमेरिकेत 11 हिंदुस्थानी आणि हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.