मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक; जालनामधील शेलगावजवळ ‘रेल रोको’

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. सोमवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. त्यांना नीट बोलताही येत नसल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. तसेच आता जनताही मिंधे सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त करत आहे. आता आंदोलकांनी जालनामध्ये रोल रोको केला आहे.

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे रास्ता रोको केल्यानंतर आंदोलकांनी शेलगाव येथील रेल्वे चौकीकडे रवाना होत दुपारी 3 वाजल्यापासून रेल्वे चौकीवरजवळील रेल्वे रुळांवर उतरत रेव रोको केला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मार्गावरुन धावणार्‍या रेल्वे जालना येथील रेल्वेस्थानकावर रोखून धरल्या. बदनापूरहून येणार्‍या रेल्वे तेथेच रोखण्यात आल्या होत्या. यावेळी मराठा आंदोलकांचा रुद्रावतार व प्रचंड घोषणाबाजीने प्रशासन प्रचंड हादरले आहे. सुमारे तीन ते चार तासांपासून रेल रोको आंदोलन सुरु आहे. शेकडो आंदोलक हे रेल्वे रुळांवर बसले असून त्यामुळे जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरु आहे.