लेख – परीक्षा बोर्डाची, जिद्द यशाची!

प्रातिनिधिक फोटो

>>अजित कवटकर, [email protected]

परीक्षेचे काही तास जर पुढील आयुष्याची परिभाषा तयार करणार असतील तर त्या तेवढय़ा क्षणांना आपली प्रामाणिक मेहनत देऊन त्याचे सोने करण्यासाठी जिद्दीला पेटण्यात फायदाच फायदा असतो. काहीच कसर न ठेवता स्वच्छ प्रयत्न करणे आपल्या हातात असते आणि ते पुरेपूर करावेत. आयुष्य म्हटले तर असे अनपेक्षित अनुभव कधीतरी येणारच. यातून योग्य बोध घेतल्यास आयुष्यातील पुढील प्रत्येक परीक्षा, आव्हाने मग आपण सहज जिंकू.

बोर्डाची परीक्षा म्हटली की, मग अभ्यास कितीही चांगला का झालेला असेना, पण वर्षभराच्या मेहनतीचे सार त्या तीन तासांत सर्वोत्कृष्ट पद्धतीने मांडण्याची लागणारी कसोटी ही कुठेतरी या परीक्षेविषयी थोडी का होईना, काळजी निर्माण करतेच. विद्यार्थीदशेतील ही पहिली महत्त्वाची व मोठी परीक्षा. लाखोंशी स्पर्धा असण्यापेक्षा ती स्वतःच्या क्षमतांची ताकद ओळखण्याची एक सुवर्णसंधी असते आणि तेदेखील अशा स्पर्धात्मक मानसिकतेत की, निकालाच्या टक्केवारीतील दशांशाचा फरकदेखील खूप मोठा वाटू लागतो. तेव्हा त्या दृष्टीनेच त्याची तयारी होणे अपेक्षित असते आणि यासाठी पुरेसा वेळ लाभावा म्हणून परीक्षेच्या काही दिवस अगोदरपासून शाळेतून मिळणारी सुट्टी ही उपयोगी पडते.

शाळा बंद, क्लास बंद आणि घरात बसून सेल्फ स्टडी करणे म्हणजे एक वेगळा अनुभव होय. मुलांना घरी अभ्यास करण्याची सवय ही असतेच, परंतु 24 तास घरात राहून व मित्रमंडळी, मोबाईल, टीव्ही यांपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवून फक्त आणि फक्त अभ्यास करणे ‘इज डिफरंट फ्रॉम नॉर्मल’, परंतु महत्त्वाकांक्षेसाठी जिद्दीला पेटणाऱ्याआजच्या पिढीला यातदेखील मजा वाटते. दिवसाचे 24 तास आता त्यांना कमी वाटू लागतात. अभ्यास झालेला असतानाही त्यासंदर्भाचे अवांतर वाचन करून एक गुणदेखील हातून चुकून निसटण्याचा स्कोपच ठेवायचा नाही म्हणून ते वेळेशी स्पर्धा करत असतात, पण ज्यांना असा स्वयंस्फूर्तीचा उत्साह जाणवत नसतो त्यांनादेखील इतर काही पर्याय नसतो. कारण घरातल्यांचा अभ्यास करण्याचा अट्टाहास त्यांना इतर कसल्याचीच सवलत देत नाही. मग जर समोर पुस्तक ठेवूनच बसावे लागणार असेल तर मनापासून अभ्यासच करून ती कृती सार्थकी लावणे अधिक योग्य व तर्कशुद्ध नव्हे का? म्हणजे दहावी-बारावीचे विद्यार्थी या दिवसांत अभ्यासच करत असतात, पण हा सततचा अभ्यास काही दिवसांनी कंटाळवाणा वाटू न देण्यातच पुढील यशापयश दडलेले असते.

झोप ही आरोग्याच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करते. शांत व पूर्ण झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांवर सकारात्मक परिणाम करून रोगांशी लढणारी रोगप्रतिकारक क्षमता वाढवत असते, त्यामुळे एकाग्रता बळावते. म्हणून या वयोगटातील विद्यार्थ्यांनी जवळपास आठ तासांची झोप घेणे आवश्यक असते. शरीर व मनाला त्रासदायक ठरणारी जागरणे अभ्यासावर प्रतिकूल परिणाम करू शकतात. वेळेच्या योग्य नियोजनातून ती टाळावीत. अभ्यासाला बसताना शांत व स्वच्छ जागा, पुरेशी हवा आणि प्रकाश, योग्य प्रकारे बसण्याची पद्धत, अभ्यासाप्रति प्रसन्नता असणे आवश्यक असते. 40 मिनिटांनंतर पाच मिनिटांचा ब्रेक घ्यावा. त्या वेळेमध्ये घरातल्या घरात चार पावले जरी चालल्यास शरीर स्ट्रेच होते, मरगळ दूर होते. 45 मिनिटांचे असे चार स्लॉट (तीन तास) पूर्ण केल्यानंतर एक अर्धा-पाऊण तासाचा ब्रेक घ्यावा. दिवसभरात असे तीन-तीन तासांचे किती स्लॉट्स करायचे हे प्रत्येकाच्या क्षमतेवर व कंटाळा न करण्याच्या मानसिकतेवर अवलंबून असते, परंतु त्रास होईल एवढा अभ्यासाचा ताण घेऊ नये. एकच विषय निरंतर करत बसल्याने उत्साह कमी होण्याची शक्यता असते. तेव्हा हा जोश टिकून ठेवण्यासाठी दर काही तासांनी विषय बदलणे योग्य ठरते. आहार हादेखील या सगळय़ावर खूप परिणाम करत असतो. त्यामुळे या दिवसांत हलके, ताजे, पौष्टिक खावे. तेलकट, मसालेदार, जड अन्न हे परीक्षा संपेपर्यंत खाणे शक्यतो टाळावेच. अधूनमधून थोडे थोडे पाणी पित रहावे. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कुठल्याच विषयात स्वतःला गुंतवू नये. नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवावे. कठीण वाटणारे विषय मागे ठेवू नये. वेगवान लिखाणातही सुंदर हस्ताक्षर राहील, याची काळजी घ्यावी. भाषेच्या विषयांतील उपयोजित लेखनासाठी थोडे अवांतर वाचन नक्कीच उपयोगी ठरते. पेपर पॅटर्न आणि उत्तरांच्या अपेक्षित फॉरमॅटला अनुसरून तयारी झाल्यास निकाल छानच लागणार.

वर्षभर मेहनत केल्यानंतर ऐन वेळेस भीतीमुळे आत्मविश्वास गमावणे नुकसानकारक ठरू शकते. परीक्षेला जाताना, पेपर लिहिताना मनावर भीती, चिंता, अनपेक्षिततेचे सावट असणे अतिशय मारक ठरू शकते. आपला पेपर चांगलाच जाणार, आपल्याला इच्छित गुण/टक्के नक्की प्राप्त होणारच हा पूर्ण विश्वास मनी बाळगून परीक्षेत आपले सर्वोत्कृष्ट प्रयत्न 100 टक्के दिल्यास यश मिळतेच. संक्षिप्तता, अचूकता, प्रभावी सादरीकरण, वेळेचे काटेकोर नियोजन याकडे पेपर लिहिताना लक्ष ठेवावे. परीक्षेचे काही तास जर पुढील आयुष्याची परिभाषा तयार करणार असतील तर त्या तेवढय़ा क्षणांना आपली प्रामाणिक मेहनत देऊन त्याचे सोने करण्यासाठी जिद्दीला पेटण्यात फायदाच फायदा असतो. काहीच कसर न ठेवता स्वच्छ प्रयत्न करणे आपल्या हातात असते आणि ते पुरेपूर करावेत. आपण कुठेतरी थोडे कमी पडलो हे शल्य भविष्यात कधीही जाणवू नये या जाणिवेतून ही मेहनत असावी. असे करून मग जो काही निकाल लागेल तो आपला म्हणून स्वीकारावा. निकाल अपेक्षेहून अधिक चांगला लागला आणि जो या मेहनतीला लाभतोच, तर तो आयुष्याच्या पुढील प्रत्येक पावलावर तुम्हाला जीवन साफल्यासाठीचा कानमंत्र असणार, प्रेरणादायी ठरणार, परंतु जर आपली मेहनत आपल्या अपेक्षा गाठण्यास कुठेतरी कमी पडली असेल तर दुःख करू नये. आयुष्य म्हटले तर असे अनपेक्षित अनुभव कधीतरी येणारच. यातून योग्य बोध घेतल्यास आयुष्यातील पुढील प्रत्येक परीक्षा, आव्हाने मग आपण सहज जिंकू.