सिनेमा – निखळ मनोरंजनाचा मसाला

>> प्रा. अनिल कवठेकर

विनोदी चित्रपटासाठी एक अफलातून गोष्ट असावी लागते. अशी गोष्ट अतिशयोक्तीच्या आधारे मांडत निखळ मनोरंजन करणारा चित्रपट म्हणजे ‘पडोसन’.

शेजारीण हा तसा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्ग किंवा सगळ्याच विवाहित पुरुषांच्या मनातील हळवा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘पडोसन’मधली शेजारीण अविवाहित आहे तसंच तिच्या शेजारी राहणारा नायकसुद्धा अविवाहित आहे. अनेक यशस्वी मनोरंजक चित्रपटांप्रमाणे हा विषय निखळ मनोरंजनाचा असल्यामुळे यातील काही घटनांबाबत हे असे होते का? असे प्रश्न पडले नाहीत.

भोला (सुनील दत्त) हा नावाप्रमाणेच भोळा आहे. त्याच्याकडे संसारात कसं वागावं? यावर एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात वयाच्या पंचवीस वर्षांपर्यंत ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे आणि सव्विसाव्या वर्षी लग्न केलं पाहिजे असं लिहिलेलं आहे. या पुस्तकात दिलेल्या विधानांवर भोला ठाम आहे. ज्या क्षणी त्याला कळतं की, आपण साडेपंचवीस वर्षांचे झालो आहोत, तेव्हा तो आपल्या आयुष्याचे सहा महिने वाया गेल्याचं म्हणतो आणि आता आपण लग्न करायला हवं हे त्याला मनोमन पटतं. तो त्याच्या मामाकडे (ओम प्रकाश) राहत असतो. मामाने आपल्या बायकोला सोडलेलं आहे. तो 50-55 वर्षांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याला लग्न करायचं आहे. ओम प्रकाश यांना आपण एरवी वय झालेला, दुबळा, थकलेला, गोंधळलेला, नायिकेचा, नायकाचा बाप अशा विविध भूमिकेत पाहिलेलं आहे, पण ‘पडोसन’मध्ये तो अत्यंत रुबाबदार, भरदार शरीर, पीळदार मिश्या आणि मालीश करून घेताना पीनवर दाखवला आहे.

नायिका बिंदू म्हणजे सायरा बानो. सुंदर, अल्लड, लाडावलेली आणि व्यवहार ज्ञान अजिबात नसलेली श्रीमंत आई-वडिलांची एकुलती एक लाडकी कन्या. आईला मुलीच्या विवाहाची चिंता आहे. बिंदू दरवर्षी परीक्षेत नापास होत असते. तिच्या वडिलांचा निश्चिंतपणा आगा यांनी खूप मस्त रंगवलेला आहे. ते अगदी निवांत असतात आणि त्यांचा एक संवाद सातत्याने ऐकायला मिळतो, ‘जब जब जो जो होना है, तब तब सो सो होता है.’ यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. भोलाची मामी मामाच्या वागण्याला कंटाळून विभक्त होऊन आरामात आपलं आयुष्य व्यतीत करत आहे. या सगळ्या भूमिका पाहिल्यानंतर असं वाटतं, खरंच असा निवांतपणा आपल्याही आयुष्यात यायला हवा. चिंता न करता आहे ती परिस्थिती स्वीकारत मजेत जगता यायला हवं. सगळ्याच व्यक्तिरेखा चिंतेपासून दूर असल्याने प्रेक्षकांनाही चित्रपट पाहताना कोणतीच चिंता उरत नाही.

विनोदी कथेतल्या गोंधळासाठी हा मसाला पुरेसा असताना त्यात किशोर कुमारच्या नाटकाच्या टीमने घातलेला गोंधळ या ‘पडोसन’ची लज्जत आणखीच वाढवतो. सुनील दत्त हे एक रुबाबदार नायक आहेत, पण त्या उंचापुऱया आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने पंचविशीचा भोळसट भोला अप्रतिम रंगवला आहे. संन्यास घेण्याच्या वयात मामा विवाह करायचं म्हणतो म्हणून भोला घर सोडून मामीच्या घरी येतो. इथे त्याची भेट शेजारी राहणाऱया बिंदूशी होते. बिंदूचे गाणे, नाचणे-बागडणे भोला पाहत असतो. पाहताक्षणी तो बिंदूच्या प्रेमात पडला आहे. आता तिला पटवणार कसं?

किशोर कुमारच्या चालू नाटकात भोला प्रवेश करतो. अतिशयोक्ती हा कथेचा गाभा असल्याने काहीही होऊ शकतं आणि ही सगळी नाटक मंडळी अर्धे नाटक सोडून बाहेर पडतात. विद्यापती (किशोर कुमार) भोलाचा गुरू आहे. नाटक कंपनी भोलाच्या घरी येते. पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून बिंदूच्या खिडकीकडे पाहत असतात. सर्व जण तिच्या सौंदर्याची तारीफ करतात. बिंदूला शिकवायला येणारा मद्रासी संगीत शिक्षक (मेहमूद) म्हणजे एक अफलातून प्रकरण आहे. तपकीर ओढणारा, मद्रासीत हिंदी बोलणारा आहे. वेगवेगळ्या खिडक्यांतून त्यांची दोघांची शिकवणी पाहणारी ही नाटक मंडळी आणि वेगवेळ्या गमती जमतींमधून उडणारी धम्माल म्हणजे ‘पडोसन’!

मेहमूद कोणतीही भूमिका अशी काही रंगवतो की, त्या भूमिकेची छाप अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत राहते. कोणतेही नवीन नट अशा प्रकारची भूमिका करताना मेहमूदचीच कॉपी करतात. त्यामुळे या चित्रपटातला मेहमूदने केलेला मास्टर पिल्लई हा अनेक चित्रपटांत अनेकांनी अशाच प्रकारे साकारला आहे. बिंदूच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मास्टरजीला बिंदू फारसं सीरियसली घेत नाही. बिंदूला गाणे पसंत आहे, तेव्हा आता तू गाणं शिकायला हवं असा सल्ला विद्यापती भोलाला देतो आणि भोला गाणं शिकायचं ठरवतो. गाणे शिकताना भोलाची जी अवस्था होते, तो स्वरांची जी काही वाट लावतो, त्याला ज्या यातना होतात, त्याची अस्वस्थता, रडणं, गाणं आलं नाही तर बिंदू भेटणार नाही, या सगळ्यामुळे होणारा त्रास हे सगळं सगळं सुनील दत्त यांनी अप्रतिम दाखवून खूपच धमाल केलेली आहे.

शेवटी भोला शरणागती पत्करतो. गुरू म्हणतो, “काही हरकत नाही. मी गातो, तू गाण्याची नक्कल कर.” मग बिंदूला पटवण्यासाठी गायलेलं अत्यंत लोकप्रिय ‘मेरे सामनेवाली खिडकी मे एक चांद का तुकडा रहता है’ गाणं सुरू होतं. हे पाहताना, ‘पडोसन’ हा जितका मेहमूद, किशोर कुमार, सुनील दत्त यांचा आहे, तितकाच तो कॅमेरामन आणि दिग्दर्शकाचा चित्रपट आहे, हे मान्य करावेच लागते. ध्वनीमधलं साम्य दाखवण्यासाठी ब्रशने पत्र्याचा डबा वाजवणं, खराटय़ावर कंगवा फिरवणं यांसारख्या गमती धूनला साजेशा आहेत. पुढे बिंदूने भोलाला हरवण्यासाठी मास्टरला गायला लावणं, ‘एक चतुर नार कर के सिंगार…’ दोघांच्या गाण्याची जुगलबंदी, किशोर कुमारने काढलेले आवाज आणि मास्टरचा पराभव हे पाहायला आणि ऐकायला आजही मजा येते.

बिंदू आणि भोलामध्ये भांडण झाल्यानंतर बिंदू जेव्हा परीक्षा द्यायला निघते तेव्हा भोलाने जाणीवपूर्वक नाकात केस घालून शिंकणं, तिच्या मार्गावर मांजर टाकून अपशकुन करणं यांसारखे बालिश प्रयोग आहेत. बिंदूला त्याचा खूप राग येतो. ती प्रेमाने भोलाला खाली बोलवते आणि त्याच्या थोबाडीत मारते. या भांडणात भोलाला मार पडतो. मध्यरात्री भोलाच्या कण्हण्याचा आवाज आल्यावर बिंदू आपल्या वडिलांना घेऊन भोलाला पाहायला जाते. इथे एक प्रेमगीत सुरू होतं.

बिंदूच्या वाढदिवसाच्या दिवशी तिची मैत्रीण विद्यापतीचा आवाज ओळखते आणि भोलाचे भांडे फुटते. बिंदूने पाहिल्यावर भोलाची उडालेली तारांबळ, तिचा संताप, या संतापाच्या भरात ती भोलाच्या मामाशी लग्न करायला तयार होते. म्हणून नाटक कंपनी भोलाच्या मामाकडे जाऊन त्याला पटवतात. इथे किशोर कुमारबरोबर ओम प्रकाशची संगीत जुगलबंदी खूपच छान जमलेली आहे. हा सगळाच गमतीदार भाग. या गमती इथे पाहायला मिळतात आणि किशोर कुमार पुन्हा त्याला “तुला आता मरावे लागेल” असे सांगून मरण्याचा अभिनय करायला सांगतो आणि शेवट गोड होतो. मास्टर पिल्लई ज्या मुलीशी आपलं लग्न होणार होतं त्याच मुलीच्या लग्नात सनई वादन करतो. संवादाची कमाल आहे, अभिनयाची धमाल आहे, कथेमध्ये मजा आहे. त्यामुळे चित्रपट पुन्हा पाहिला तरी कंटाळा येत नाही. जिचा कधीही कंटाळा येणार नाही अशी ही ‘पडोसन’ आहे.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)