मुद्दा : इष्टापत्ती समजून गाळ उपसा

62

> ज्ञानेश्वर गावडे

मुंबई शहराला मोडक सागर, तानसा, वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा धरणातून दररोज 3800 दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणात सुमारे साडेचौदा लाख दशलक्ष लिटर्स पाणी असावे लागते, परंतु गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर रोजीच 2 लाख दशलक्ष पाणीसाठा कमी होता, परिणामी या वर्षी दहा टक्के पाणी कपात करावी लागलेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनते 17 टक्के पाण्याचा तुटवडा सहन करावा लागला, आजच्या तारखेला मुंबईसाठी 22 टक्केच उपयुक्त पाणीसाठा राहिला असल्यामुळे मुंबईकरांसाठी दिवसाआड पाणीपुरवठय़ाची वेळ येईल अशी स्थिती आहे. त्यामुळे उपरोक्त पाणी पुरवण्याच्या तलावांचा तळ खाली गेलेला आहे ही इष्टापत्ती समजून तलावांचा तळ खरडून गाळ काढण्याची सुसंधी महापालिकेला मिळणारी आहे. परंतु वेळोवेळी किती गाळ काढल्याचे वृत्त महापालिकेकडून वाचायला मिळत नसल्यामुळे तलावांचा तळ गाळाने भरलेला असा असा समज झालेला आहे. म्हणून ज्याप्रमाणे मुंबईतील नालेसफाईतून गाळ काढल्याची माहिती दिली जाते तशी पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांची तशी माहिती मिळत नाही. अनधिकृत माहितीनुसार जेव्हा तलावातून गाळ काढण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ज्या कुजलेल्या गाळातून जी दुर्गंधी पसरते त्याला स्थानिक लोकांची व कर्मचाऱयांची तीक्र नापसंती असल्याकारणाने समूळ गाळ काढणे टाळले जात असल्याचे समजते. म्हणून या वर्षी उपयुक्त पाण्याच्या साठय़ाखाली जर तलावांचा तळ गेला असेल तर ती इष्टापत्ती ठरते आणि नालेसफाईसारखीच तलाव तळांची समूळ सफाई करण्यास उपलब्धता मिळू शकेल. तलावातून गाळ काढणे तसे शेवटी फायद्याचे ठरते. गाळ काढल्यामुळे पाणी साठविण्याची क्षमता वाढतेच, त्याशिवाय पाण्याचा साठा जेवढा खोल असतो, तेवढे पाण्याच्या वरच्या थराचे बाष्पीकरण टळते, परिणामी तलाव आटण्याचे प्रमाण तुलनेने कमी कमी होत जाते. त्याशिवाय काढलेल्या गाळांची उपयुक्तता शेतकऱयांना फायदेशीर ठरते. गाळाच्या जमिनीतील जैवविविधता पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

आपली प्रतिक्रिया द्या