ठसा – प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

>> विकास कोकाटे

महाराष्ट्रातील ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे यांची निवड भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत ‘अमूर्त सांस्कृतिक ठेवा’ या युनेस्कोच्या कमिटीवर सदस्य म्हणून झाली आहे. ‘‘दिवाळी’ या भारतीय सणावर युनेस्कोतर्फे मान्यता आणि संशोधनाचे कार्य होणार आहे. या प्रकल्पासाठी भारतातील एकूण 13 अभ्यासकांची निवड करण्यात आली आहे. त्यात डॉ. खांडगे यांचा समावेश आहे.

डॉ. प्रकाश खांडगे हे लोककला, लोकसाहित्याच्या क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व. खांडगे सरांनी लोककलेच्या क्षेत्रातील केवळ राज्य पातळीवर अथवा देश पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील लोकसाहित्य, लोककलेच्या क्षेत्रात लौकिक संपादन केला आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीवर महापरिषद सदस्य म्हणून कार्यरत असणाऱया खांडगे सर यांचे कार्य एखाद्या दीपस्तंभासारखे आहे.

मुंबई विद्यापीठात 2004 मध्ये तत्कालीन कुलगुरू, ज्येष्ठ विचारवंत, अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककला अकादमी हा विभाग स्थापन झाला. त्यामागची संकल्पना डॉ. मुणगेकर यांची होती. त्यांनी या अकादमीची धुरा मोठय़ा विश्वासाने खांडगे सरांवर सोपविली. ऑगस्ट 2004 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या अकादमीचे उद्घाटन झाले. खांडगे सरांनी लोककलेचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम तयार केला. त्यानंतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमदेखील तयार केला. 2007 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते शाहीर अमर शेख अध्यासन हे अभ्यास पेंद्र लोककला अकादमीत सुरू झाले आणि त्याचे समन्वयक म्हणूनही खांडगे सर यांनी कार्य केले. 2006 ते 2017 पर्यंत सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना अनेक भव्य उपक्रम त्यांनी विद्यापीठामार्फत राबविले. त्यात त्यांना लोककला अकादमीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गणेश चंदनशिवे यांचेही सहकार्य लाभले. आशिया लोककला महोत्सव, राष्ट्रीय बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, संगीत नाटक अकादमी आदी राष्ट्रीय पातळीवरील संस्थांसोबत परिषदा लोककला महोत्सव असे उपक्रम या अकादमीने राबविले. परंपरा महोत्सव हा विद्यापीठाच्या लौकिकातला शिरपेच होय. 1978 पासून डॉ. खांडगे सर यांचे लोकसाहित्य लोककलेच्या क्षेत्रात संशोधनाचे कार्य सुरू झाले. 1978 मध्ये इंडियन नॅशनल थिएटर लोकप्रयोज्यकला संशोधन पेंद्र या पेंद्रात ज्येष्ठ नाटककार, गीतकार, लोककलेचे संशोधक अशोक परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली खांडगे सरांनी संशोधनाचे कार्य सुरू केले. गोंधळ, जागरण, ललित, भारुड, तमाशा अशा वेगवेगळय़ा लोककलांवर इंडियन नॅशनल थिएटरमार्फत विविध उपक्रम सुरू झाले. त्यात 1979 मध्ये ‘खंडोबाचे लगीन’ हे नाटक इंडियन नॅशनल थिएटरने रंगभूमीवर आणले. संशोधनावर आधारित हे पहिले नाटक होय. रंगभूमीच्या इतिहासात या नाटकानेदेखील इतिहास घडविला. कारण न्यूयॉर्कमध्ये या नाटकावर संशोधन पेपर सादर झाला. बार्शीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ‘खंडोबाचे लगीन’ सादर झाले. ज्येष्ठ नाटककार सुरेश चिखले यांनी या नाटकाचे लेखन केले होते, तर संशोधनाची पूर्ण जबाबदारी खांडगे सरांनी सांभाळली होती. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्येदेखील हे नाटक सादर झाले होते.

जागरण – एक विधीनाटय़ इतिहास वाङ्मय प्रयोग या शीर्षकाखाली मराठी विभाग मुंबई विद्यापीठ येथून खांडगे सरांनी पीएचडी केली. या प्रबंधाला उत्कृष्ट संशोधन प्रबंध म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच या प्रबंधावर आधारित ‘खंडोबाचे जागरण’ या ग्रंथाला महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट संशोधन ग्रंथ माडखोलकर पुरस्कार प्राप्त झाला होता. याशिवाय सांस्कृतिक क्षेत्रातील विशेषतः लोककला क्षेत्रातील कार्याबद्दल 2001 मध्ये पद्मश्री दया पवार पुरस्कार, 2010 मध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्कार म्हणजेच कलादान पुरस्कार प्राप्त झाला होता. अमेरिका, चीन, नेपाळ आदी देशांमधील आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य लोककला परिषदांमध्ये त्यांनी केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे नेतृत्व केले आहे.

त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन 2019 मध्ये त्यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा अतिशय प्रतिष्ठsचा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनमध्ये प्रदान करण्यात आला होता. लोककला क्षेत्राची अभ्यासपद्धती शोधून त्याची अंमलबजावणी करण्याचे विद्यापीठ पातळीवर फार मोठे काम खांडगे सरांनी केले आहे.