साज तरंग अकॉर्डियन

>> हर्षवर्धन दातार

‘अकार्ड’ म्हणजे संगीतातील कॉर्डचा सुसंवाद. पाश्चात्य देशांत सोलो म्हणून तर आपल्याकडे हे वाद्य साथ आणि इंटरल्यूड (मधलं संगीत) वापरतात. अकार्डियनच्या ठळक सुरावटींमुळे अनेक गाणी वैशिष्टय़पूर्ण ठरली. याचं सर्व श्रेय या वाद्याचा समावेश करणाऱया संगीतकारांना तसेच वाजविणाऱया श्रेष्ठ कलाकारांना.

या पूर्वीच्या लेखात आपण हार्मोनियम किंवा पेटी या वाद्यावर आधारित गाण्यांचा आढावा घेतला. यात पेटी हे वाद्य वाजलं तर आहेच, त्याचबरोबर बऱयाच गाण्यात पडद्यावरील कलाकारसुद्धा पेटी वाजवताना दिसतात. ‘हावडा ब्रिज’मध्ये (1958) ‘देख के तेरी नजर’ या मधुबालावर चित्रित क्लब गाण्यात एक वादक गळ्यात अडकवलेली पेटी वाजवतो. ‘संगम’ (1964) चित्रपट आठवा. त्यात गोपाल (राज कपूर) पार्टीत ‘हर दिल जो प्यार करेगा, वो गाना गायेगा’ हे गाणं चक्क एक उभी पेटी गळ्यात अडकवून म्हणतो किंवा ‘अमर अकबर अँथनी’ (1977) यात क्लायमॅक्स दृश्यातील गाण्यात पडद्यावर विनोद खन्ना अंगावर अनेक वाद्यं घेऊन ‘अनहोनी को होनी कर दे’ हे गाणं म्हणतो. त्यात परत आपल्याला गळ्यात ही उभी पेटी दिसते, तर हे वाद्य म्हणजे अकार्डियन. ‘अकार्ड’ म्हणजे संगीतातील कॉर्डचा सुसंवाद. पाश्चात्त्य देशांत सोलो म्हणून तर आपल्याकडे हे वाद्य साथ आणि इंटरल्यूड (मधलं संगीत) वापरतात. यात रिदमकरिता बेसबोर्ड, कीबोर्ड आणि मधे हवा भरण्या-सोडण्याकरिता भाता असतो. पियानो अकार्डियन, बटन अकार्डियन, क्रोमॅटिक अकार्डियन असे अकार्डियनचे अनेक प्रकार चित्रसंगीतात वापरले गेले.

गुडी सिरवयी सर्वात जुने अकार्डियन वादक. आधी बॅण्डमध्ये आणि क्लबमध्ये वाजवत. सुप्रसिद्ध तालवादक कावस लॉर्डनी त्यांची ओळख नौशादबरोबर करून दिली. वर उल्लेख केलेल्या ‘दास्तान’(नौशाद) आणि समाधी (चितळकर) चित्रपटांच्या गाण्यात त्यांनी अकॉर्डियन वाजवले. पुढे त्यांनी शंकर-जयकिशनबरोबर ‘चोरी चोरी’ (1956) यात ‘आजा सनम मधुर चांदनी मे हम’ आणि ‘लव्ह मॅरेज’मध्ये (1959) ‘धीरे धीरे चल चांद गगन मे’ यात अकार्डियनची सुरेख साथ केली. ओ. पी. नय्यर संगीत दिग्दर्शित ‘हावडा ब्रिज’मधील ‘बाबूजी धीरे चलना’ या गाण्यात त्यांचाच अकार्डियन वाजला आहे. ‘हम सब चोर है’ (1956) यात आशा भोसले यांनी गायलेलं ‘वो दिल जिसपे धडके जिया’ यात गुडी सिरवयी यांचा अकार्डियन आहे. राज कपूरच्या ‘आवारा’मध्ये (1951) ‘एक बेवफा से प्यार किया’ या गाण्यात स्वत गुडी सिरवयी अकॉर्डियन वाजवताना दिसतात.
विस्पी बलसारा एक दिग्गज वादक. ‘दाग’ (1952) यातलं दिलीप कुमारवर चित्रित आणि तलत मेहमूदचे ‘ऐ मेरे दिल कही और चल’ आणि ‘पतिता’मधलं (1953) हेमंत कुमार-लता द्वयीचे ‘याद किया दिल ने कहा हो तुम’ ही त्यांनी अकॉर्डियनवर वाजवलेली गाजलेली गाणी.

सुमित मित्रांनी 1957 साली सिरवयींचे सहाय्यक म्हणून सुरुवात केली. संगममधील ‘हर दिल जो प्यार करेगा’ यात अकार्डियनचे सूर वाजवलेत याच सुमित मित्रांनी. असे म्हणतात की, गुडी सिरवयींच्या वेळ न पाळण्याच्या बेशिस्त स्वभावामुळे पुढे बरीच कामे सुमित मित्रांना मिळाली आणि त्यांनी हजारो गाण्यांमध्ये अकार्डियनची साथ केली. शंकर-जयकिशनबरोबर आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारे मित्रा जयकिशन यांच्यापश्चात लक्ष्मीकांत-प्यारेलालकडे रुजू झाले. त्यांच्या ‘पारसमणी’ (1963) या पहिल्या आणि लोकप्रिय संगीतप्रधान चित्रपटात ‘हसता हुवा नूरानी चेहेरा’ गाण्यात मध्ये वाजलेली जबरदस्त सुरावट मित्रांच्या अकार्डियनची आहे. ‘दोस्ती’ (1964) या सुपरहिट चित्रपटातील ‘गुडिया हमसे रुठी रहोगी’ आणि ‘कोई जब राह न पाये’ या गाण्यात मित्रांचा अकॉर्डियन आहे. लोकप्रिय चित्रपट ‘बॉबी’ (1972)मध्ये ‘हम तुम एक कमरे में बंद हो’ यात सुमित मित्रांचा अकार्डियन अनेकदा वाजला आहे. शायर साहीर लुधियानवींच्या ‘क्या मिलीये ऐसे लोगो से’ या ‘इज्जत’मधील (1968) रफीच्या गाण्यात मधल्या संगीतात आपल्याला अकार्डियनचे स्पष्ट सूर ऐकू येतात.

केरसी लॉर्ड अनेक दशके आणि नौशादपासून ते आर.डी. बर्मनपर्यंत अनेक संगीतकारांना वाद्यवृंदात साथ देणारे हरहुन्नरी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे अष्टपैलू वादक, नामांकित लॉर्ड घराण्याचा वारसा पुढे नेणारे. केरसीजींनी अकॉर्डियन गुडी सिरवयींकडून शिकला. ‘रूप तेरा मस्ताना’ (‘आराधना’- 1971) या गाण्यात राजेश खन्ना – शर्मिला टागोरचा प्रणयप्रसंग अकार्डियनच्या सुरावटीतून परिणामकारक साधला आहे. ‘ओ मेरी शर्मिली’ ( ‘शर्मिली’- 1974) आणि भूपिंदर च्या आवाजातले ‘रूत जवां जवां’ (‘आखरी खात’ – 1966) ही त्यांनी अकार्डियनची साथ केलेली ठळक गाणी.

इनॉक डॅनियल अकार्डियन वादकांत एक आदरणीय सुप्रसिद्ध वादक आणि संगीत संयोजक. यांचा उल्लेख केल्याखेरीज हा लेख अपूर्ण राहील. संगीत जगतात अकार्डियन आणि इनॉक डॅनियल एकाच नाण्याच्या दोन बाजू. लहानपणी ऑर्गन आणि पियानोपासून नंतर अकार्डियन आणि गिटार अशी अनेक वाद्यं त्यांनी सराईतपणे हाताळली. ‘बीस साल बाद’ (1960) यातलं ‘बेकरार करके हमे यूं न जाईये’, तसेच ‘लव्ह इन टोकियो’च्या (1966) गाणी आणि ‘सुजाता’मधलं (1959) प्रसिद्ध टेलिफोन गाणं ‘जलते है जिसके लिये’ ही त्यांनी अकार्डियनची साथ दिलेली काही प्रसिद्ध गाणी. 1950 ते 1980 या दशकातील सर्व प्रसिद्ध संगीतकारांबरोबर त्यांनी वादक आणि संयोजक म्हणून उल्लेखनीय काम केलं आहे.

अकार्डियनचे सूर ठळकपणे ऐकू येतात अशी आणखी काही गाजलेली गाणी म्हणजे मुकेशनी गायलेले शंकर-जयकिशन यांचे ‘अनाडी’ (1959) ‘सच है दुनियावालो के हम है अनाडी’ आणि ‘जीना यहाँ मरना यहाँ’ – ‘मेरा नाम जोकर’ (1970), मुकेशनीच मोतीलालकरिता गायलेले सलील चौधरींचे ‘जिंदगी ख्वाब है’ – ‘जागते रहो’ (1956) आणि किशोर कुमारचे ‘तबियत मचल मचल गायी’- ‘हाफ टिकट’ (1962). आर. रेहमानचे ‘ए हैरती आशिकी’ – ‘गुरू’ (2007) आणि ‘दिल तो बच्चा है जी’ – ‘इश्किया’ (2010). अकार्डियन प्रामुख्याने वाजलेली इतर काही संगीतकारांची गाणी. आर. डी. बर्मन – ‘इक दिन बिक जायेगा’ (‘धरम करम’ – 1975), कल्याणजी-आनंदजी – ‘चले थे साथ मिलकर’ (‘हसीना मान जायेगी’ – 1968), चित्रगुप्त-‘ये पर्बतो के दायरे’ (‘वासना’-1968), राजेश रोशन – ‘न बोले तुम न मैने कूछ कहा’ (‘बातो बातो में’ – 1979), आणि रवी – ‘ये परदा हटा तो’ (‘एक फूल दो माली’- 1969). विधू विनोद चोप्राचा ‘परिंदा’ (1989) यात वाल्ट्झ तालावरच्या ‘तुमसे मिलके ऐसा लागा तुमसे मिलके’ या गाण्यातील मधल्या संगीतात आठवणीत राहण्यासारखा तुकडा वाजवला आहे. बहुधा पंचमदांचे लाडके सुराज साठे यांनी. वाल्ट्झ ताल आणि अकार्डियनची सुरावट यांचं एक जवळचं नातं आहे. बऱयाच गाण्यांत जिथे अकार्डियनची सुरावट आहे, ती गाणी वाल्ट्झ ठेक्यावर आहेत. अलीकडच्या काळात अरुण पौडवाल (अनिल-अरुण संगीत द्वयीतले) आणि सुराज साठे (आर. डी. बर्मन यांचे आवडते वादक) यांनी अकार्डियन वादनात आपला ठसा उमटविला. 1980 च्या दशकात ‘सिन्थेसाईझर’ या कुठलेही वाद्य वाजवू शकणाऱया प्रारूपाप्रमाणे आगमन झालेल्या वाद्यामुळे अनेक वाद्ये बेरोजगार झाली. त्यात अकॉर्डियन हे प्रामुख्याने आहे. लेखातील सर्व गाणी त्यात वाजलेल्या अकार्डियनच्या ठळक सुरावटींमुळेच ओळखली जातात. याचं सर्व श्रेय या वाद्याचा समावेश करणाऱया संगीतकारांना तसेच वाजविणाऱया श्रेष्ठ कलाकारांना.

z [email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)