साय-फाय – बंगळुरूचे पाणी संकट

>> प्रसाद ताम्हणकर

हिंदुस्थानचे आयटी हब, अशी ओळख असलेले बंगळुरू शहर सध्या भीषण पाणी संकटाचा सामना करत आहे. अशी परिस्थिती यापूर्वी कधी न अनुभवलेले अनेक लोक त्यामुळे भांबावून गेले आहेत. पुढील शंभर दिवस हे संकट असेच कायम राहील असा तज्ञांचा आणि इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. बंगळुरूची खालावत चाललेली भूजल पातळी हे या समस्येचे मुख्य कारण मानले जात आहे. या भीषण पाणीबाणीच्या संकटाचा सर्वात मोठा फटका नव्यानेच बंगळुरूमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 110 गावांना बसलेला आहे. एकेकाळी देशातील थंड शहरांपैकी एक म्हणून ओळख असलेले बंगळुरू या वेळी उष्णता आणि उष्णतेच्या लाटांचा सामना करेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

या पाणी संकटामुळे लोकांच्या रोजच्या जीवनावर तर परिणाम झाला आहेच, पण त्यांना विविध नव्या नियमांनादेखील सामोरे जावे लागत आहे. अनेक निवासी इमारतींमध्ये पाण्याच्या टँकरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पूर्वी 700 रुपयांना मिळणाऱया टँकरचे दर आता 1000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. विविध सोसायटय़ांनी आपल्या इमारतीमध्ये राहणाऱया लोकांसाठी नवे नियम लागू केले आहेत. आठवडय़ातून फक्त दोनवेळा गाडी धुण्याचा नियम तर अनेक ठिकाणी लागू केला गेला आहे. बहुमजली इमारती असलेल्या ठिकाणीदेखील पाण्याच्या नियोजनासाठी विविध नियम अमलात आणले जात आहेत. अर्धी बादली आंघोळीसाठी आणि अर्धी बादली बाथरूमच्या स्वच्छतेसाठी वापरावी असे आवाहन अनेक ठिकाणी केले जात आहे.

साधारण दीड कोटीच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या शहरासाठी 145 कोटी लिटर पाणी 95 किलोमीटरचा प्रवास करून कावेरी नदीतून आणण्यात येते, तर 60 कोटी लिटरच्या पाण्यासाठी बोअरवेलची मदत घेतली जाते. मात्र आता अनेक बोअरवेलदेखील कोरडय़ा पडत चालल्या असून इतर बोअरवेलची पाणी पातळी खालावत चाललेली आहे. पूर्वी 250 फुटांवर मिळणारे पाणी आता 1800 फुटांपर्यंत तळाशी गेलेले आहे. त्यामुळे काही ठिकाणी तर 4000 लिटर पाण्याची क्षमता असलेल्या टँकरची किंमत 1500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

वेगाने वाढणारी लोकसंख्या, बाहेरच्या शहरातून इथे नोकरीधंद्यासाठी येणारे लोक आणि अत्यंत वेगाने आणि बेसुमारपणे चालू असलेली बांधकामे यांचादेखील या समस्येला हातभार लागल्याचे जलतज्ञ सांगतात. शहरातील अनेक तलाव कोरडे पडलेले आहेत. काही तलावांच्या संरक्षण आणि जतनासाठी सामाजिक संस्था आणि तज्ञांनी प्रयत्न केल्याने ते अजून तग धरून आहेत. क्षीण पडत चाललेला ईशान्य आणि नैऋत्य मान्सूनमुळे पाऊसदेखील कमी झालेला आहे. या कारणाने पाण्याच्या अभावी अनेक तलावांचे पुनरुज्जीवन होऊ शकलेले नाही. त्यातच कावेरी जल प्रकल्पावर वाढत चाललेला दबाव हादेखील चिंतेत भर घालणारा आहे.

खरे तर कावेरी जल प्रकल्पाचा सध्या चौथा टप्पा चालू आहे. या प्रकल्पाचा पाचवा टप्पा गेल्या वर्षीच्या मध्यापर्यंत पूर्ण व्हायला हवा होता. मात्र कोविडच्या काळात या कामाचा वेग मंदावला आणि त्याला उशीर झाला. आता एप्रिलपर्यंत हा टप्पा कार्यरत होईल असा अंदाज आहे. 110 गावांतील 50 लाख लोकांना त्यामुळे पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल. एप्रिलमध्ये 5 ते 10 कोटी लिटर पाण्याचे पंपिंग सुरू होईल. त्यानंतर पुढच्या पाच ते सहा महिन्यांत आधी 30 कोटी लिटर आणि त्यानंतर 75.5 कोटी लिटरपर्यंत ही क्षमता वाढवत नेली जाईल. कावेरी जल प्रकल्पाचा हा पाचवा टप्पा 2035 ते 2040 पर्यंत चालू राहील, असा तज्ञांचा अंदाज होता. मात्र सध्या ज्या वेगाने इथे लोकसंख्या वाढत चालली आहे, ते बघता तज्ञांचा हा अंदाज आता 2029 पर्यंत खाली आलेला आहे.

वाहतूक ही सर्वात मोठी समस्या असलेल्या बंगळुरूचे नाव आता पाण्याच्या कमतरतेमुळे गाजू लागले आहे. पाण्याच्या या समस्येने बंगळुरूच्या नावाला बट्टा लागत असल्याची खंत अनेक स्थानिक नागरिक बोलून दाखवू लागले आहेत. नव्याने गुंतवणूक करणारे लोक आता इथे येण्यापूर्वी दहावेळा विचार करतील अशी भीतीदेखील स्थानिक प्रशासनाला जाणवू लागली आहे.