मुद्दा – वाहतूककोंडी आणि पदपथ समस्या

>> राजेश तु. मयेकर

मुंबईत बहुतेक ठिकाणी रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम जोमाने सुरू आहे. रस्त्यांचे रुंदीकरण तर होतच आहे, पण त्या रस्त्यांवर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या पार्किंगने ‘कळस’ गाठला आहे. महापालिका रस्त्यांचे रुंदीकरण का करत आहे? तर वाहनांना अडथळे निर्माण न होण्यासाठी, वाहतूककोंडी न होण्यासाठी मग रस्त्यांच्या रुंदीकरणानंतरदेखील तीच स्थिती का आहे? अडथळे आणि वाहतूककोंडीचे प्रकार होतच आहेत. तेही मोठय़ा प्रमाणात. याला कारणीभूत या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेले वाहनांचे पार्किंग आहे! जर या वाहनांचे पार्किंग असेच होत राहिले तर रस्त्यांच्या रुंदीकरणाला काहीच अर्थ राहणार नाही. मुंबईत लोकवस्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. वाहन खरेदी जोमाने वाढली आहे. आजची स्थिती अशी आहे तर काही वर्षांनी मुंबईत रस्त्यावर चालणे-फिरणेही त्रासदायक होईल. 25 ते 50 वर्षांपूर्वी मुंबई मोकळी होती. मुंबईतील वाहतूक आटोक्यात होती. रस्त्यांवर मोकळेपणाने चालता-फिरता येत होते. बस-ट्रेनमध्ये प्रवास करताना मोकळेपणा, हवेशीरपणा होता, पण आता मात्र ते मुंबईचे चित्र पाहायला मिळत नाही. लोकवस्तीचे सोडाच ती तर वाढतच राहणार, पण वाहने ही अशीच वाढत राहिली तर काहीच नियंत्रणात राहणार नाही. वाहनकोंडीचा प्रश्न कधीच सुटणार नाही. मुंबईतील रस्त्यांवरून मोकळेपणाने चालणे अवघड होईल. याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

त्याचबरोबर मुंबईतील रस्त्यांच्या कडेला असणारे पदपथ हे पादचाऱयांचे राहिले नाहीत. या पदपथांवर परप्रांतीयांनी धंदे थाटून पादचाऱयांचा विचारच सोडून दिला आहे. पादचारी काय ते चालतील रस्त्यांवरून, पदपथ आम्हा धंदेवाल्यांचेच आहेत. ही एवढी हिंमत कशामुळे यांच्यात आली आहे? कारण महापालिका त्यांच्यावर काहीच कारवाई करीत नाही हीदेखील कधीच न सुटणारी समस्या झाली आहे. याबाबतीत महापालिका प्रशासन ‘गांधारी’प्रमाणे डोळय़ांवर पट्टी बांधून आहे. मुंबईची रस्ते वाहतूककोंडी आणि पदपथ समस्या सोडवायची असेल तर रस्ते नियंत्रण कक्ष व महापालिकेला कडक शासन करावेच लागेल.