हॉलीवूड – अ‍ॅण्ड ऑस्कर गोज टू…

>> तरंग वैद्य

कलेला भाषेची अडचण नसते. त्यामुळेच हॉलीवूड हिंदुस्थानातही तितकाच लोकप्रिय आहे. म्हणूनच ’हॉलीवूड’चा ’अ‍ॅकॅडमी आवॉर्ड’, म्हणजेच ऑस्कर अ‍ॅवॉर्ड कुणाला मिळणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. यंदा ’ओपेनहायमर’ बघा, ’पुअर थिंग्स’ या दोन चित्रपटांनी ऑस्कर अ‍ॅवॉर्डमध्ये चांगलीच बाजी मारली. या दोन्ही कलाकृतींबद्दल हिंदुस्थानी माध्यमविश्वात प्रसिद्धी झाली. भाषा कोणतीही असली तरी चांगल्या कलाकृती बघितल्या गेल्या पाfिहजेत, त्यांचं स्वागत केलं पाहिजे हेच अशा पुरस्कार सोहळ्यांतून सूचित होते.

हिंदी सिनेदर्शक आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे तंत्र विभाग आणि अभिनेते दरवर्षी ’फिल्मफेयर अ‍ॅवॉर्डस्’ किंवा ’राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जाहीर होण्याची अतिशय आतुरतेने वाट बघत असतात. त्याचप्रमाणे ’हॉलीवूड’चा ’आकॅडमी अ‍ॅवॉर्ड’, ज्याला आपण ’ऑस्कर’ नावाने ओळखतो… हे अ‍ॅवॉर्ड कुणाला मिळणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. कुठलाही पुरस्कार अतिशय महत्त्वाचा असतो. कारण ही एक कौतुकाची थाप असते, आपण केलेल्या मेहनतीचे चीज झाले ही भावना असते. कलाकार असो वा सामान्य माणूस, कौतुक किंवा प्रोत्साहन सर्वांनाच हवे असते. कारण त्यातूनच चांगले, आणखीन चांगले करायची जिद्द येते.

अतिशय मानाचा समजला जाणारा ‘आकॅडमी अ‍ॅवॉर्ड’ वर्ष 1929 पासून देण्यात येत आहे. म्हणजेच ऑस्कर या वर्षी 96 वर्षांचा झाला. या लांबच्या प्रवासात ’बेन-हर’ (1959), ’टायटॅनिक’ (1997) आणि ’लॉर्ड ऑफ द रिंग्स’ (2003) या तीन हॉलीवूड चित्रपटांनी प्रत्येकी 11 ऑस्कर जिंकण्याचा पाम केला.

10 मार्च 2024 (हिंदुस्थानी वेळेनुसार 11 मार्च सकाळी 4.30 वाजता) ‘यूएस अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अ‍ॅण्ड सायन्सेस’च्या वतीने हॉलीवूड, लॉस अँजेल्स येथील डॉल्बी थिएटरमध्ये 2023 च्या चित्रपटांचे मूल्यांकन करून त्यांना पुरस्कृत करण्याचा सोहळा मोठय़ा दिमाखात सुरू झाला आणि क्षण दर क्षण उपस्थित प्रेक्षकांची आणि सोहळा टीव्हीवर ‘लाईव्ह’ बघणाऱ्यांची उत्कंठा वाढवत गेला.

’96 अॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड… अ‍ॅण्ड ऑस्कर गोज टू…’ हे घोषवाक्य ऐकत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्तम दिग्दर्शनाचे मानाचे मुख्य पुरस्कार जिंकून ’ओपेनहाइमर’ या चित्रपटाने बाजी तर मारलीच, पण ’संकलन’, ’सिनेमॅटोग्राफी’, ’संगीत’ आणि ’सहाय्यक अभिनेता’ हे पुरस्कारही आपल्या नावावर करीत तब्बल सात पुरस्कार जिंकून सोहळा गाजवला. आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ’ओपेनहायमर’ या चित्रपटाला तब्बल 13 नामांकने मिळाली होती. अणुऊर्जेच्या संशोधनात महत्त्वाचा सहभाग असलेल्या जे. रॉबर्ट ओपेनहायमर ज्यांना ’अणुबॉम्बचा जनक’ म्हणूनही संबोधले जाते. त्यांचा जीवनावर आधारित हा चित्रपट 1926 ते 1959 चा काळ दाखवतो. त्या काळातील सुरू असलेलं महरुवाचे अणुसंशोधन, ज्याची सुरुवात एका चांगल्या उद्देशाने झालेली असते, पण या अणुऊर्जेचा विनाशासाठी कसा वापर केला जातो याची इत्यंभूत माहिती हा चित्रपट देतो. ‘हिरोशिमा-नागासाकी’चा विनाश आणि रॉबर्टची मानसिकता सखोल पद्धतीने दाखवत किलियन मर्फी या अभिनेत्याने कमाल केली आहे. ’अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड… बेस्ट अ‍ॅक्टर… आण्ड ऑस्कर गोज टू किलियन मर्फी… ािढस्टोफर नोलेन यांनी या ’बायोपिक’ची निर्मिती केली असून लेखन आणि दिग्दर्शन ही त्यांचंच आहे. त्या काळातील राजकीय घडामोडी, द्वितीय विश्वयुद्धाची पार्श्वभूमी, वैज्ञानिकांची कार्यशैली, त्यांची मानसिकता उत्कृष्ट पद्धतीने दाखवत त्यांनीही कौतुकाचा ‘ऑस्कर’ जिंकला आहे सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी.

सात ऑस्करच्या पाठोपाठ वस्त्रभूषा, रंगभूषा, प्रॉडक्शन डिझाईनचे ऑस्कर जिंकून ’पुअर थिंग्स’ या चित्रपटाने आपली छाप सोडली आहे. वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात ’एमा स्टोन’ने ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा ऑस्कर जिंकून चित्रपटाची ऑस्कर संख्या 4 केली आहे. आण्ड ऑस्कर गोज टू… एमा स्टोन. तिचा हा दुसरा ऑस्कर, पहिला ‘ला ला लँड’ चित्रपटासाठी 2017 साली तिला मिळाला होता. हिंदुस्थानातील चित्रपट रसिकांनी 11 मार्चला पहाटे न विसरता हा अद्भूत, दिमाखदार सोहळा बघितला.

कलेला भाषेची अडचण नसते. त्यामुळेच हॉलीवूड हिंदुस्थानातही तितकाच लोकप्रिय आहे हे दिसून येते, तर ’ओपेनहायमर’ बघा, ’पुअर थिंग्स’ बघा, कारण चांगल्या कलाकृती बघून आपल्या कक्षा रुंदावतात आणि विचार प्रगल्भ होतात.

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)