दिल्ली डायरी – कर्पुरी ठाकूर नेमके कोणाचे?

>> नीलेश कुलकर्णी   

बिहारचे पहिले मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर कोणाचे? यावरून सध्या बिहारमध्ये राजकीय जुगलबंदी रंगली आहे. त्यामागे कर्पुरीबाबूंबद्दलचे ममत्व वगैरे नसूनजातीनिहाय जनगणने बिहारमध्येअतिपिछडाम्हटला जाणारा 26 टक्के दलित वर्ग आपल्याकडे ओढण्याचा राजकीय पक्षांचा स्वार्थ आहे. त्यासाठी सगळय़ाच राजकीय पक्षांत जबरदस्त खेचाखेची सुरू आहे.

बिहारचे पहिले मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांची 100 वी जयंती 24 जानेवारीला आहे. त्यानिमित्ताने त्यांची ‘आठवण’ आता भाजपसहित विविध राजकीय पक्षांना येत आहे. ठाकूर मुख्यमंत्री होते तेव्हाच्या त्यांच्या साधेपणा व प्रामाणिकपणाच्या चर्चा आजही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळतात. मुख्यमंत्री ठाकुरांच्या पत्नी त्याकाळी शेतीकाम करायच्या या गोष्टीवर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही कदाचित! नाभिक समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाकुरांच्या निमित्ताने ‘महादलित व्होटबँक’ मिळविण्यासाठी बिहारमध्ये चढाओढ सुरू आहे. एरवी या सर्व महादलितांचे ‘मसीहा’ हे नितीशबाबू राहिलेले आहेत. नितीश कुमारांनी कर्पुरींचे चिरंजीव रामनाथ यांना दोन वेळा राज्यसभेवर पाठवून त्या समाजांत योग्य तो संदेशही दिला आहे. मात्र तरीही नितीशबाबू लालूंसोबत गेल्यापासून त्यांचे व्होटबँकेचे गणित काहीसे बिघडले आहे. त्यातच जातनिहाय जनगणनेत दस्तरखुद्द नितीशबाबूंची कुर्मी ही जमात अगदीच अल्पसंख्य ठरल्याने ही जनगणना म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ अशी स्थिती नितीश कुमारांसाठी तरी झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी कर्पुरीबाबूंच्या जयंतीला टिळा लावून आपली राजकीय पोळी भाजण्यात सगळेच दंग आहेत.

मोदींचे सरकार आल्यापासून ज्यांची पाळेमुळे काँग्रेसमध्ये रुजली, वाढली त्या नेत्यांचीही भाजपने पळवापळवी केली. आता त्यात कर्पुरी ठाकुरांची भर पडली आहे. ठाकूर हे राष्ट्रीय नेते नव्हते आणि नाहीत. मात्र तरीही सामाजिक क्रांतीच्या अनुषंगाने स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानात सवर्णांचा बोलबाला असलेल्या बिहारमध्ये एका उपेक्षित समाजाचा मुख्यमंत्री होतो ही त्यावेळची उल्लेखनीय घटना होती. त्यातूनच पुढे बिहारमध्ये ‘बिगर प्रस्थापितां’च्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यामुळे बिहारमध्ये आपला निभाव लागावा यासाठी आता जातीपातीच्या राजकारणाने जोर धरला आहे. एरवी भाजपला बिहारमध्ये फारसा जनाधार नव्हता. मात्र त्या पक्षाने अत्यंत हुशारीने ही व्होटबँक आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याची प्रचीती दिसून आलीच. कर्पुरी ठाकूर यांच्याशी काडीमात्र संबंध नसताना त्यांच्या 100 व्या जयंतीचा सर्वात मोठा गाजावाजा भाजप करत आहे. त्यामुळे नितीश कुमारांच्या गोटातही अस्वस्थता आहे. नितीशबाबूंचा एकछत्री अमल खतम करणे हा भाजपचा अजेंडा आहे. त्यात ते यशस्वी होतील की नाही ते येणारा काळच ठरवेल. मात्र सध्याचे बिहारमधले जयंतीचे जल्लोषी वातावरण पाहून दस्तरखुद्द कर्पुरी ठाकुरांनादेखील स्वर्गात आपण नेमके कोणाचे? हा प्रश्न पडल्यास आश्चर्य वाटायला नको.

गमांग यांचीघरवापसी

तब्बल नऊ वेळा खासदार राहिलेले ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरिधर गमांग यांनी आठ वर्षांनंतर काँग्रेसमध्ये ‘वापसी’ केली आहे. गमांग हे काही देशपातळीवरचे टोलेजंग नेते नाहीत की ज्यांच्या घरवापसीची चर्चा व्हावी. मात्र गिरीधर गमांग माहीत नाहीत असेही नाही. अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारविरोधात 1999 मध्ये अविश्वास दर्शक ठरावावेळी गमांग यांनी सरकारविरोधात मतदान केल्याने वाजपेयींचे सरकार केवळ एका मताने पडले होते. त्यावेळी गमांग यांचे हे ‘एक मत’ चर्चेत आले होते आणि एका मताची ‘किंमत’ काय असते याचीही जाणीव सगळय़ांना झाली होती. गमांग एका राज्याचे मुख्यमंत्री असतानाही लोकसभा सदस्य म्हणून मतदान करणे कितपत नैतिकतेला धरून आहे, अशी चर्चा व टीका त्यावेळी झाली होती. मात्र राजकारणात मुळात नैतिकतेला काही स्थान नसते. नैतिकतेच्या ऱ्हासाची सुरुवात म्हणून या घटनेकडे पाहिले गेले. गमतीचा भाग म्हणजे ज्यांच्या एका मताने अटलजींचे सरकार पडले त्या गमांग महाशयांना भाजपने पवित्र शुद्ध करून भाजपमध्ये घेतले. तिथेही त्यांचे मन रमले नाही. मग ते चंद्रशेखररावांच्या नादाला लागून बीआरएसमध्ये गेले. हा त्रिस्थळी प्रवास संपवून गमांग आपल्या कुटुंबकबिल्यासह काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. अर्थात त्यांच्या काँग्रेसमधल्या घरवापसीमुळे काँग्रेसला लगेचच ‘अच्छे दिन’ येतील याची सुतराम शक्यता नाही. यामागची प्रमुख कारणे म्हणजे ओडिशात नवीन पटनायकांचा असलेला एकछत्री अमल आणि गमांग यांच्या बेस संपणे. एकेकाळी आदिवासींचे नेते असलेल्या गमांग यांचा पूर्वीसारखा प्रभाव राहिला नाही. त्यामुळे गमांग यांच्या काँग्रेसमधील वापसीने काहीही साध्य होणार नसले तरी बऱ्याच दिवसांनी 1999 च्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या हे नक्की!

राजनाथ सिंहांचेट्रफिक जाम

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे एक कद्दावर नेते आहेत.  संरक्षण खात्याकडे मायबाप सरकारचे पुरेसे लक्ष नसल्यानेच अगदी छोटे शेजारी देशही आता आपल्या सीमांची घुसखोरी करून दमबाजी करू लागले आहेत. हे काही ‘सशक्त भारता’चे लक्षण नाही. अधिकार नसलेल्या संरक्षणमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत मोठय़ा गफलतीचा किस्सा पुढे आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या शपथविधीला जाण्यासाठी (राजनाथ सिंह तिथे पक्षनिरीक्षकही होते) निघालेल्या राजनाथ यांना सवाई मानसिंग हॉस्पिटलजवळ दहा मिनिटे ट्रफिकमध्ये अडकून पडावे लागले. त्यांना झेड प्लस सुरक्षा गार्ड देण्यासही विलंब झाला आणि ट्रफिक जाम कधी सुटतो याची वाट पाहत राहावी लागल्याची गंभीर बाब आता पुढे आल्याने खडबडून जागे झालेल्या दिल्लीतील सरकारने राजस्थान सरकारला यासंदर्भात जाब वगैरे विचारला असून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षणमंत्री हे देशाचे सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक आहेत, असे असताना ही अक्षम्य चूक कशी घडली की घडवून आणण्यात आली? याबद्दलही तर्क-वितर्क लढविले जात आहेत. वसुंधरा राजेंना डावलून भजनलाल यांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भातली ती ‘चिठ्ठी’ राजनाथ यांनीच वसुंधरांच्या हातात दिली होती. त्या घटनेचीही काही किनार यामागे आहे का? याबद्दल चर्चा होत आहे.

[email protected]