ठसा – मनीषा कोळी

>> रचना बागवे

सारंग आर्टस् ही सावंतवाडीची लाकडी खेळणी आणि कलाकृती बनवणारी एक लघुउद्योग संस्था 2013पासून महाराष्ट्रातील कला, खेळणी, सजावटीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू आणि इतर भेटवस्तू जगभर पोहोचवण्याचे प्रयत्न करतेय. ही खेळणी शक्यतो नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवल्याने नेहमीच्या चिनी किंवा विषारी प्लॅस्टिकच्या धोकादायक खेळण्यांना एक फार सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. सारंग आजमितीस स्वीडन, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, दुबई, कॅनडा, जपान आणि देशभरात आपली संस्कृती जोपासण्याची एक पर्वणीच आहे.

सारंगच्या संस्थापक मनीषा कोळी म्हणतात, ‘बरीच वर्षं मी पाहिले की पूर्वापार चालत आलेल्या कलाकृती आणि अनेक दुकाने लुप्त होत चाललीत. गावागावांतील कारागीर नवीन प्लॅस्टिक अथवा चिनी खेळण्यांबरोबर स्पर्धा करू शकत नव्हते. काहीतरी केले पाहिजे याचा विचार करून मी आणि आई मिळून 2013ला सारंग चालू केले. सावंतवाडीच्या खेळण्यांपासून केलेली सुरुवात, नंतर मातीचे रंगीत दिवे, डहाणूतील वारली कलाकृती, येवल्यातील पैठणी, बेळगावातील इरकल, कोल्हापुरी चप्पल, अशा अनेक मराठी कला आणि कारागीर सारंगबरोबर जोडले गेले. याच कारागीरांना, गरीब शेतकरी, झोपडपट्टीतील महिलांना आणि जेव्हा रोजगार मिळतो तेव्हा खूप समाधान वाटते. सुरुवातीला आर्थिक क्षेत्रातील खासगी कंपनीतली नोकरी सोडून ठाणे-मुंबईतून विक्री आणि मार्केटिंग केली. त्यातच नवऱ्याबरोबर अनेक देश फिरताना पाहिले की त्या त्या देशातील लोक आपल्या पारंपरिक वस्तूंमध्ये खूपच आकृष्ट असतात. मग तेच मी जागतिक पातळीवर पोहोचवण्याचे ठरवले. मी केलेला एमबीए आणि फॉरेन ट्रेड (MBA & Foreign tgrade) त्यात कामी आले.’

आता महाराष्ट्रातून आणि देशभरातून अनेक कारागीर, जसे तंजावरच्या नाचणाऱ्या बाहुल्या, पश्चिम बंगालच्या सोलावूड कला, गाझियाबादच्या तांब्या-पितळेच्या मूर्ती, मोरादाबादमधील लाकडी कलाकृती, अशा अनेक कारागीर आणि संस्था सारंगबरोबर जोडले गेले. 2021पर्यंत सारंगने लंडन, कॅनडा, जर्मनी, स्वीडनमध्ये जम बसवला. स्वीडनमधील हिंदुस्थानी वकिलात (Indian Consulate) मधून मनीषा कोळी यांना हिंदुस्थानी संस्कृती आणि कलाकृती जोपासण्यासाठी समाविष्ट करून घेतेले. विविध देशांतील मराठी मंडळ, इंडियन ग्रॉसर्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि बऱ्याच मित्रमंडळींमार्फत ‘सारंग’ने होळी, गणपती, दसरा, रक्षाबंधन, नवरात्री आणि दिवाळीसारख्या अनेक सणांना साजेशा कलाकृती, भेटवस्तू, पूजासामग्री आणि इतर सांस्कृतिक वस्तू देशोदेशी पोहोचविल्याने ‘सारंग’ म्हणजे एक मराठमोळे कलाकेंद्र बनले. एक मराठी स्त्री, 10 वर्षांचा मुलगा आणि घरदार सांभाळून कोकणातून मुंबई-ठाणे आणि जगभर आपली संस्कृती आणि कला पसरवते, स्थानिक कलाकारांना जागतिक मंच देते, हे पाहून अभिमान वाटतो.