लेख – शांत पंजाब हिंसक का झाला?

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन 

हिंसाचार घडवणे सोपे असते. पण त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड काम असते. त्याचा अनुभव देशाने 80 च्या दशकात घेतला होता. म्हणूनच पंजाबमधील आताची ज्वालामुखीच्या उंबरठय़ावरील परिस्थिती पाहता व्यापक उपायांची आवश्यकता वाटते. आपण काहीही केले तरी व्यवस्था आपल्यासमोर झुकते अशी त्यांची धारणा आहे. त्यातून झुंडबळीसारखे प्रकार करण्याची प्रेरणाही मिळत आहे. हिंसाचार करून दाखविण्याच्या मानसिकतेवर दीर्घकालीन उत्तर शोधणे गरजेचे आहे. अन्यथा अराजकवादी पंजाबमध्ये हवे ते करत राहतील. समाजकंटक आणि खलिस्तानी त्याचा फायदा घेतील.

गेल्या तीन दशकांपासून पंजाब शांत होता तो पंजाब आज हिंसक का झाला आहे. त्यावर जितक्या लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील, तितके ते देशाच्या दृष्टीनेही हिताचे ठरेल. गेल्या महिनाभरात गुरुग्रंथसाहिबच्या बेअदबीच्या काही घटना पंजाबमध्ये घडल्या. समाजाला भडकवण्यासाठी काही समाजविरोधी आणि देशविरोधी शक्ती धार्मिक ग्रंथाच्या बेअदबीचे प्रकार तर पंजाबमध्ये करीत नाही ना?

बेअदबी मग ती कुराण शरीफची असो, भगवद्गीतेची असो की गुरुग्रंथसाहिबची असो; असे करणाऱ्याला जाहीररीत्या फासावर लटकवले पाहिजे, अशी मागणी नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली. हिंदुस्थानचा क्रिकेटपटू हरभजन सिंगने ऑपरेशन ब्लू स्टारच्या 37 व्या वर्षानिमित्त आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे सुवर्ण मंदिरात ठार झालेल्या खलिस्तानी जनरल भिंद्रनवालेला श्रद्धांजली वाहिली आहे. भज्जीने जनरल भिंद्रनवालेला शहीद असल्याचं आपल्या स्टोरीतून दाखवल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा राग अनावर झाला. ‘अभिमानाने जगा आणि धर्मासाठी मरा’ असे इंस्टाग्राम स्टोरीमध्ये भज्जीने स्टेटस ठेवले आहे.

पंजाब राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर काही खेळाडू राजकारणात प्रवेश करायच्या तयारीत आहेत. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येताच लुधियाना बॉम्बस्फोटाच्या आधीच 18 डिसेंबरला अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ‘गुरुग्रंथसाहिब’च्या अवमानावरून एकाचा झुंडबळी घेण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कपूरथलातील गुरुद्वारातही ‘गुरुग्रंथसाहिब’च्या अवमानावर एका व्यक्तीची जमावाने हत्या केली.

कपूरथला येथील निजामपूर गुरुद्वारात एक तरुण उपाशी असल्याने भाकरीच्या शोधात गेला होता. या वेळी ‘निशान साहिब (पवित्र ध्वज)’चा अपमान केल्याचा आरोप करत शीख जमावाने या तरुणाची हत्या केली.

2015 मध्ये घडलेल्या अशाच घटनेची चौकशी सरकारने सीबीआयकडे सोपवली होती. या प्रकरणात संशयाची सुई शिरोमणी अकाली दलाच्या दोन सर्वोच्च नेत्यांवर स्थिरावली होती. नंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सीबीआय चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणाचा सीबीआय तपास करीत असतानाच विशेष तपास पथकही याचा तपास करीत हेते. पंजाब उच्च न्यायालयाने एसआयटीच्या प्रमुखाला बदलण्याचा आदेश देत या प्रकरणाचा तपास पुन्हा पंजाब पोलिसांकडे सोपविला. या प्रकरणाची चौकशी आता सुरू आहे.

पंजाबमधे राजकीय अस्थिरता आहे. तिथे सप्टेंबरपर्यंत कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्रीपदी होते, त्यांनी राजीनामा दिला आणि चरणजितसिंग चन्नी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी आले. तत्पूर्वी, अमरिंदर सिंग व पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांच्यात वाद होता. सिद्धू यांनी तो वाद नंतर चन्नी यांच्याबरोबर सुरू केला. अजूनही दोन्ही नेत्यांतील वाद संपलेला नाही. आता आंदोलनांमध्ये भाग घेतलेल्या शेतकरी संघटनांनी आपल्या वेगळ्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे व ते निवडणुकीत भाग घेणार आहेत. याला वर्चस्वाचा मुद्दा कारणीभूत आहे.

पंजाबमधील शेतकऱ्यांचा कृषी कायदाविरोधी आंदोलनात सर्वाधिक सहभाग होता व तेथील पक्षाचा त्याला जोरदार पाठिंबा होता. कृषी कायदाविरोधी आंदोलनाच्या काळात झालेला हिंसाचार संपूर्ण देशाने पाहिला आहे. पंजाबमधील अंतर्गत संघर्ष आणि कृषी कायदाविरोधी आंदोलनाने तयार झालेले वातावरण यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती होती. अस्थिरतेचा फायदा करून घेण्यासाठी समाजकंटक टपलेलेच होते. पंजाबमधील कृषी कायदाविरोधी आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या रस्त्यांवर धुडगूस घालत, राष्ट्रध्वजाचा अवमानही केला होता.

पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’ ड्रोनच्या मदतीने ‘एके-47’ रायफल, स्फोटके, अमली पदार्थ आणि बनावट नोटा पंजाबमध्ये पाठवीत आहे. पंजाबच्या पाकिस्तान सीमेवरून अफूच्या तस्करीकडे सीमा सुरक्षादलांकडून कानाडोळा केला जातो. पोलीस खात्याशी अफू माफियांचे साटेलोटे आहे. राजकीय संरक्षणाशिवाय हा बेकायदेशीर व्यापार होऊच शकत नाही. आज पंजाबचे सत्ताधारी, राजकीय नेते व त्यांचे जवळचे आप्तेष्ट, अनेक इतर माफिया यात सामील आहेत. दिवसाकाठी सुमारे 1400 कोटी रुपयांचे अमली पदार्थ युवक फस्त करतात.

हिंसाचार घडवणे सोपे असते. पण त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड काम असते. त्याचा अनुभव देशाने पंजाबमध्येच 80 च्या दशकात घेतला होता. म्हणूनच पंजाबमधील आताची ज्वालामुखीच्या उंबरठय़ावरील परिस्थिती पाहता, व्यापक उपायांची आवश्यकता वाटते. आपण काहीही केले तरी व्यवस्था आपल्यासमोर झुकते, अशी त्यांची धारणा आहे. त्यातून झुंडबळीसारखे प्रकार करण्याची प्रेरणाही मिळत आहे. हिंसाचार करून दाखविण्याच्या मानसिकतेवर दीर्घकालीन उत्तर शोधणे गरजेचे आहे. अन्यथा, पंजाबच्या राजकारणातील अस्थिरतेचा गैरफायदा घेत अराजकवादी पंजाबमध्ये हवे ते करत राहतील. पंजाबच्या राजकारणातील अस्थिरतावादी, अराजकवादी, हिंसाचार करणारे समाजकंटक आणि खलिस्तानी त्याचा गैरफायदा घेतील.

समाजविघातक आणि देशविघातक शक्तींपासून पंजाबमधील सर्व राजकीय पक्षांनी आणि जनतेने सावध राहण्याची गरज आहे. यावेळच्या पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत अन्य मुद्दय़ांसोबत गुरुग्रंथसाहिबच्या बेअदबीचा मुद्दाही गाजणार आहे. वातावरण तापविण्यासाठी बेअदबीच्या आणखी काही घटना घडविण्याचा प्रयत्न समाजविघातक आणि देशविघातक शक्तींकडून झाला तर आश्चर्य नाही. मात्र यामुळे भडकून राज्यातील जनतेने कायदा हातात घेण्याची गरज नाही. आपण पाकिस्तानच्या सापळ्यात अडकणार नाही, असा निर्धार सर्व राष्ट्रप्रेमींना करावा लागणार आहे.

[email protected]