ठसा – कुमार साहनी 

>> दिलीप ठाकूर

 बंगाली  चित्रपटसृष्टीत रुजलेली समांतर अथवा नवप्रवाहातील चित्रपट चळवळ मुंबईतील चित्रपटसृष्टीत अर्थात हिंदीत सत्तरच्या दशकात आली आणि मग एकेक चित्रपट निर्माण होत होत ती रुजली. त्यात एक महत्त्वाचे नाव होते, दिग्दर्शक कुमार साहनी. कोलकता येथे त्यांचे 25 फेब्रुवारी रोजी निधन झाले. दिग्दर्शक कुमार साहनी म्हटल्यावर चित्रपट अभ्यासक व विश्लेषक कायमच त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘माया दर्पण’ ( 1972) या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करतात. निर्मला वर्मा यांच्या गोष्टीवरील या चित्रपटाचे लेखनही त्यांचे होते आणि या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. त्या वर्षीच्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाचा सहभाग होता.

कुमार साहनी यांचा जन्म 7 डिसेंबर 1940 रोजी सिंध प्रांतातील लरकाना येथील. तेव्हा ते पाकिस्तानात होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साहनी कुटुंब मुंबईत आले. साठच्या दशकात कुमार साहनी यांनी पुणे येथील दूरदर्शन आणि चित्रपट अभिनय संस्थेत ( एफटीआय) चित्रपट माध्यमाचे शिक्षण घेतले आणि पदवी प्राप्त केली. चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यात आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे, विचार करावयास लावणारे चित्रपट निर्माण होऊ शकतात यावर त्यांचा तेव्हाच विश्वास बसला. जगभरातील वास्तववादी चित्रपट पाहणे, समजून घेणे, भरपूर वाचन करणे यावर त्यांचा विशेष कटाक्ष होता. या माध्यमाची आणखी ओळख होण्यासाठी ते फ्रान्सच्या चित्रपटसृष्टीत गेले आणि ‘यूके फेम डूस’ या चित्रपटासाठी ते दिग्दर्शक रॉबर्ट ब्रेसन यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शकांच्या संचात सहभागी झाले. आपण रॉबर्ट ब्रेसन यांच्याकडून चित्रपटाचा विषय व दृश्य माध्यमातून मांडणी याबाबत बरेच काही शिकलो असे कुमार साहनी यांचे म्हणणे होते आणि त्यांनाच ते आपले एक गुरू मानत. त्यांचे दुसरे गुरू म्हणजे बंगाली भाषेत वेगळ्या आशयावर चित्रपट दिग्दर्शित करणारे ऋत्विक घटक. कुमार साहनी यांनी ‘माया दर्पण’ या चित्रपटापासून आपली वेगळी वाट चोखळली आणि मग अजिबात कसलीही घाई न करता एकेक चित्रपट दिग्दर्शित केला. त्यात ‘तरंग’ ( 1984), ‘खयाल आ गया’  (1989), ‘कसबा’ ( 1990) अशा काही हिंदी तसेच ‘भावनाथरना’ ( 1991), ‘चार अध्याय’ ( 1997) अशा अनेक बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. ‘चार अध्याय’ हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यावर आधारित होता. त्याचे लेखन कुमार साहनी यांच्यासह उदयन वाजपेयी, रिमली भट्टाचार्य यांचे आहे. हा चित्रपट गीत, संगीत व नृत्य यांवर होता. परंपरा आणि आधुनिकता यांचा त्यात मेळ होता. या कलाकृतीची बरीच चर्चा रंगली.

कुमार साहनी हे लेखक व शिक्षक म्हणूनही ओळखले जात. चित्रपट माध्यमाबद्दल ते चित्रपट प्रशिक्षण संस्थेत शिक्षण देत. त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ‘The shock of desire and other essays’ हे त्यांचे बहुचर्चित पुस्तक. देशविदेशातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत परीक्षण मंडळात त्यांचा कायम सहभाग असे. त्यांचे चित्रपटविषयक लेखन व व्याख्यान चित्रपट माध्यमात येणाऱ्या नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शक ठरे.

बंगाली अर्थात प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना जगभर ओळख मिळवून देण्यात यशस्वी ठरलेल्या सत्यजित राय, मृणाल सेन, ऋत्विक घटक यांच्या परंपरेतील तपन सिन्हा वगैरे दिग्दर्शकांत कुमार साहनी यांचे नाव घेतले जाते. देशभरातील समांतर चित्रपटांच्या वाटचालीत अदूर गोपालकृष्णन, गिरीश कासारवल्ली, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी अशा दिग्दर्शकांत कुमार साहनी यांचाही समावेश होतो.