ठसा – सुनंदाताई पटवर्धन

>> महेश काळे

प्रगती  प्रतिष्ठानच्या सुनंदाताई पटवर्धन गेल्या ठाणे जिह्यातील वनवासींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजविणारी एक अख्खी पिढी संपली आहे. दिवंगत वसंतराव पटवर्धन हे केवळ संघ परिवारातच नव्हे, तर अगदी मोखाडय़ापासून सुदूर अंतरावर असलेल्या आसे – बरिस्तेसारख्या दुर्गम भागांतदेखील अत्यंत आदराने घेतले जाणारे एक नाव. दुर्गम अशा वनवासी क्षेत्रात विस्तार करायचा असेल तर त्याला विकासाची जोड दिली पाहिजे, असा विचार वसंतरावांनी केला. ‘प्रगती प्रतिष्ठान’ हे त्यांच्या या विचाराला आलेले मूर्त स्वरूप म्हणावे लागेल.

वसंतरावांनी प्रगती प्रतिष्ठान उभी तर केली, पण या प्रतिष्ठानची सर्वांगीण उन्नती करण्याचे श्रेय मात्र निश्चितपणे सुनंदाताईंनाच द्यावे लागेल. काही वर्षांतच जव्हार – मोखाडा भागातील पाडय़ापाडय़ांवर निवास करणाऱ्या एका सामान्य वनवासींच्या घरातदेखील ‘वहिनी’ हे नाव अत्यंत आदराने घेतले जाऊ लागले. तीस वर्षांपूर्वी प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून ठाण्यापासून थेट जव्हार, मोखाडासारख्या दूरवरच्या भागात एक महिला धडाडीने प्रवास करत एक सामाजिक संस्था चालवते आहे, याचे लोकांना त्या काळी प्रचंड अप्रूप होते. धडाडी, कल्पकता, व्यवस्थापन- प्रशासन कौशल्य या बळावर सुनंदाताईंनी प्रतिष्ठानची प्रगती सर्वांगाने विस्तारित केली. शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास, ग्राम विकास अशा जवळपास सर्वच आयामांना स्पर्श करत सुनंदाताईंनी वनवासी विकासासाठी विविध उपक्रम राबवले. जव्हार परिसरातील मूकबधिरांची समस्या लक्षात आल्यानंतर सुरू झालेल्या मूकबधिर विद्यालयासारख्या प्रकल्पामधून त्यांच्या या वेगळ्या दृष्टीची प्रचीती येते. मात्र ज्या प्रकल्पांची आवश्यकता संपली आहे असे प्रकल्प बंद करण्यासदेखील त्या मागे हटल्या नाहीत. आज जव्हारमधील मूकबधिर विद्यालय व संस्थेची प्रशासकीय टुमदार इमारत सुनंदाताईंच्या कर्तृत्वाची साक्ष देत उभी आहे.

जव्हार – मोखाडा हा तसा आजही अत्यंत दुर्लक्षित, दुर्गम असा परिसर. सत्तर वर्षे झाल्यानंतरदेखील आजही कित्येक पाडे पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यावर चर्चा अनेक जण करतात, पण सुनंदाताईंनी यावर मार्ग काढला. जव्हार – मोखाडा तालुक्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ, शुद्ध पाणी मिळाले पाहिजे आणि गावात वीज पोहोचली पाहिजे असा ध्यास घेऊन त्यांनी विविध संस्थांच्या मदतीने हे कार्य हातात घेतले. आज या दोन्ही तालुक्यांमधील जवळपास 140 पेक्षा अधिक गावांना प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे. तसेच वर्षानुवर्षांपासून अंधारात जीवन व्यतीत करणाऱ्या शेकडो गावांना सौर वीज पुरवण्याचे कामदेखील प्रतिष्ठानने यशस्वीपणे केले. या सर्व उपक्रमांच्या यशस्वीतेमागे एखाद्या कामाचा ध्यास घेऊन ते पूर्णत्वास नेण्याचा सुनंदाताईंचा स्वभाव हाच कारणीभूत ठरला. सुनंदाताईंनी आपल्या अफाट कर्तृत्वाच्या बळावर संस्थेची चौफेर प्रगती केली. आज प्रगती प्रतिष्ठान म्हणजे जव्हार, मोखाडय़ातील हजारो वनवासी मंडळींचा प्रमुख आधार मानला जातो.

सामाजिक कार्याबद्दल सुनंदाताईंचा अनेक पुरस्कार देऊन गौरव झाला, पण वनवासी बांधवांची ‘वहिनी’ हा एका अर्थाने त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठा पुरस्कार होता. सुनंदाताई म्हणजे वात्सल्य आणि दरारा यांचं एक अद्भुत मिश्रण होते. प्रशासन, शिस्त याबाबत अत्यंत कठोर, पण वनवासी बांधवांबाबत तेवढय़ाच कनवाळू असा त्यांचा स्वभाव होता. मूळ विचार कायम ठेवत आधुनिकतेची जोड देत उत्तम प्रशासन आणि शिस्त या बळावर सामाजिक संस्था पुढे कशी न्यायची याचा एक आदर्श वस्तुपाठ सुनंदाताईंनी घालून दिला.