लेख – सोपानदेवांचा ‘अभंगबद्ध’ समाधी सोहळा

>> नामदेव सदावर्ते

संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी सोहळ्यानंतर ज्ञानदेवांचे लहान भाऊ व गुरूबंधु श्री सोपानदेव यांच्या समाधी सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत संत नामदेवांनी अभंगबद्ध केला आहे. कार्तिक मासात त्रयोदशीस ज्ञानदेवांचा समाधी सोहळा आळंदी येथे पार पडल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीस सासवड येथे सोपानदेवांचा समाधी सोहळा करण्यात आला. जसे अलंकापूर हे पावन तीर्थक्षेत्र आहे. तसेच हे कऱ्हा नदीपठार असलेल्या सासवड क्षेत्राचे महानत्व अपार आहे. हे प्राचीन पुण्यक्षेत्र आहे. श्रीमल्हार खंडेराव देव या पंचक्रोशीचे राखणदार आहेत. असे हे पवित्र तीर्थक्षेत्र सोपानदेवाच्या समाधीसाठी निश्चित केले गेले.

संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी सोहळ्यानंतर ज्ञानदेवांचे लहान भाऊ व गुरूबंधु श्री सोपानदेव यांचा समाधी सोहळा मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीस सासवड येथे करण्यात आला. संवत्सर-सासवड या ग्रामाचे स्थानमहात्म्य वर्णन करताना नामदेवराय म्हणतात-

भक्त समागमे हरी । सत्वर आले संवत्सरी ।। 

ब्रह्मानंद परोपरी । चरणधरी सोपानदेव ।।

गरुडावर बसून भगवान संवत्सर ग्रामी उतरले. पुंडलिक मुनींसह वैष्णवांचा मेळा देवासोबत होता. भागिरथी, गंगा, यमुना, सरस्वती आदी मुख्य सरिता कऱहानदीत येऊन एकरूप झाल्या. इंद्र, चंद्र व सर्व देव, सिद्ध-नवनाथ, सनकादिक आदी सर्व वेदध्वनी व नामाचा गजर करीत सासवड येथे आले. गगनातून दिव्यसुमनांचा वर्षाव सोपानदेवांवर करण्यात आला.

नामा म्हणे सकळ जगाचा । उदय जाहलासे दैवाचा ।।

सुकाळ केला स्वानंदाचा । ब्रह्मविद्येचा मृत्युलोकी ।।

जसे अलंकापूर हे पावन तीर्थक्षेत्र आहे. तसेच हे कऱ्हा नदीपठार असलेल्या सासवड क्षेत्राचे महानत्व अपार आहे. हे प्राचीन पुण्यक्षेत्र आहे. श्रीमल्हार खंडेराव देव या पंचक्रोशीचे राखणदार आहेत. असे हे पवित्र तीर्थक्षेत्र सोपानदेवाच्या समाधीसाठी निश्चित केले आहे. सोपान व चांगावटेश्वर आले. दोघांनी निवृत्तीनाथास वंदन केले. सोपानाने दाही दिशांचे सूक्ष्म अवलोकन केले.

आकाशात प्रचंड मेघगर्जना होऊन सर्पाकार व चक्राकार विजा लखलखू लागल्या. रानोमाळी ज्योतीतेज प्रकाशले.

नामा म्हणे देवा उदय जाला सकळ ।

सोपानदेवे मूळ दाखविले ।।

सोपानास जनीवनी सर्वत्र परब्रह्म दिसू लागले. समाधीपूर्वीच ज्योतिर्लिंगब्रह्म पाहत सोपानाने भगवंताचे स्तवन सुरू केले. ते नमन करीत म्हणतात- हे चराचर नाशवंत आहे. मायेचा सर्व व्यवहार अशाश्वत आहे. प्रकृती पुरुषाचा हा खेळ आहे. ब्रह्माचा हा विस्तार पुन्हा ब्रह्मातच लय पावतो. अद्वैताचे साम्राज्य पहा.

नामा म्हणे स्वामी जाताती सकळ ।

ब्रह्मी माया मूळ जाली कैसी ।।

यानंतर भगवान पांडुरंग म्हणाले, आता समाधीस्थळ स्वच्छ सुशोभित करा. नारा, विठा, गोंदा, महादा ही नामदेवांची मुले पुढे झाली. त्यांनी समाधी विवरात जाऊन समाधीस्थळ स्वच्छ केले. परिसा भागवत व चांगदेवांनी समाधीपूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आणले. शुद्ध सुगंधी पाण्याने समाधीस्थळ सुशोभित केले.

कऱहा नदीतीरावर द्वादशीच्या दिवशी देवासह वैष्णव भक्त स्नानासाठी आले. गंधाक्षता टाकून सोपानाची पूजा केली.

नामा म्हणे पूजा केली हृषिकेशी ।

चला पारण्याशी अवघे जण ।।

राहीरखुमाईसह रिद्धीसिद्धीने पक्वान्नाची पाकसिद्धी केली. भगवंतानी पत्रावळी टाकल्या. सारे वैष्णव जेवण्यास बसले. विसोबा, पुंडलिकासह पांडुरंगांनी जेवण वाढले. नंतर नामदेवाने सोपानास आणले. चांगा वटेश्वर, निवृत्तिनाथ, संत सारे पारणे सोडण्यास आले. सोपानदेव मध्यभागी बसले. पुंडलिकाने सोपानाच्या गळ्यात पुष्पमाळा घातली. रखुमाईने जेवण वाढण्यास सुरुवात केली.

त्रयोदशीला सोपान समाधी घेणार आहे म्हणून सर्व शोकाकूल झाले. सोपान व चांगदेवाचे देहभान हरपले. सर्व संत, साधूजन कासाविस झाले. समाधीभोवती कुंकुमाचे सडे टाकण्यात आले. दर्भ आणि फुले समाधीस्थळी पसरविली. दुर्वा बेलपत्री अंथरली. निवृत्ती, पांडुरंगांनी सोपानास समाधी आसनावर बसविले. सोपानाने देवाचे स्तवन-नमन सुरू केले. दीर्घ स्तुतीपर नमन झाल्यावर पांडुरंग सोपानास म्हणाले.

आता स्तुती पुरे पुरे सोपाना । प्रेभळांचिया निधाना ।।

संतुष्ट जालो रे वचना । एक एका तुझिया ।।

तू अवतार चतुरानन । ऐसे बोलिले जगज्जीवन ।।

भगवंताचे बोलणे ऐकून सोपानाने स्तवन करणे थांबविले व मौन घेतले. मग भगवंतानी प्रमुख तीर्थांना पाचारण केले व सोपानास तीर्थ देण्यास सांगितले. भागिरथी, गंगा, जान्हवी, मंदाकिनी या सर्व नद्या स्त्रीरूप घेऊन आल्या व त्यांनी सोपानदेवास पंचारतीने ओवाळले. तसेच योगी, नवनाथ नारायण, सिद्ध मूनिजनांनी वेदघोष आरंभ केला.

मंगल तुरे वाजती । महावैष्णव हरिकथा करिती ।।

समाधी स्थानावर बसून सोपानदेव देवाचे स्तवन करताना म्हणतात-

नमो सद्गुरू निवृत्ति । नमो रखुमाईच्या पती ।

नमो ज्ञानमूर्ती अगम्य पुरुषा ।।

नमो ब्रह्मांड व्यापका । नमो गुणातिता मायांतका ।

चुकवी जन्ममरण एका । तारी विश्वकृपेने ।।

नमो बारा ज्योतिर्लिंगा । नमो पंढरी पांडुरंगा ।

नमो भिवरा चंद्रभागा । नमो नमो वैकुंठपीठा ।।

सोपानदेवानी केलेले संपूर्ण स्तवन ऐकून सर्व भक्तजन स्फुंदून स्फुंदून शोक करू लागले. प्रत्यक्ष पांडुरंगासही रडू आले. सर्व संत कळवळले. गरूड-हनुमंत विसोबा आदी सर्व संत शोकातिरेकाने रडू लागले. निवृत्ति, मुक्ताई, चांगदेव यांनाही दुःख झाले. नामदेव देवास म्हणतात- हे देवा, दुःखसागर निर्माण झाला आहे. आता सोपानाला आपणच सावरा. सोपानदेव समाधीस्थळावर पद्मासनी बसले. त्यांनी लिहिलेला ग्रंथ त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. मुक्ताई, निवृत्ती व पांडुरंग हे सोपानाजवळ थांबले होते. जयजयकारध्वनी झाला. रखुमाई व भगवान पांडुरंग जवळ असताना सोपानास देवांनी समाधीस बसविले. देवाचे प्रेम पाहून सोपानदेवास अश्रू अनावर झाले. मार्गशीर्ष शके 1218 कृष्ण त्रयोदशीस सोपानदेव समाधीस्त झाले. मुक्ताई, निवृत्ती मौन झाले. नामदेवराय म्हणतात-

अंतरीचे जाण बा पंढरीनाथ । आले अश्रूपात सोपानासी ।।

सोपानाची बोळवण करीतसे हरी। दीर्घध्वनी करी नामदेव।।

समाधीजवळ धूपदीप लावून ज्योति उजळताच सर्वांना रडू कोसळले. सोपानदेवांनी सर्वांना नमस्कार केला. सोपानाने तीर्थ घेतले व डोळे झाकले. निवृत्ती, मुक्ताई व देव समाधीस्थळाहून बाहेर आले. नामदेव सर्वांना नमस्कार करून म्हणाले.

जयजयकारे टाळी पिटली सकळां। घातियेली शिळा समाधीसी।।

निवृत्ति मुक्ताईने घातियेली घोन । करितो समाधान पांडुरंग।।

खेददुःख जाले अवघ्या साधूजना । केली प्रदक्षिणा समाधीसी ।।

निवृत्ति मुक्ताईने वंदिली समाधी। देहभान शुद्धि हारपली।।

नामा म्हणे देवा उठा अवघेजण । करु आचमन भोगावती।।

सर्व वैष्णवजणांनी समाधी पूजन करून समाधीस प्रदक्षिणा केली. त्रयोदशीच्या रात्री कीर्तन केले. चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी भोजने केली. अमावस्येला रात्री जागरण करून माघ प्रतिपदेच्या दिवशी सर्वजण सासवड सोडून निघाले. निवृत्ती व मुक्ताई दोघेही उदास झाली. वटेश्वर चांगदेव देवास म्हणाले. हे देवा, आता मला आपणांसोबत न्या व मला समाधीत स्थिर करा.

नामा म्हणे देवा माघमास नेमा । चांगदेवा प्रेमा समाधी देऊ।।

सर्वांनी सोपानदेवांच्या समाधीस वंदन केले.