Liquor Policy Case – ED ला केजरीवालांच्या नव्या फोनचा पासवर्ड का हवाय? ‘आप’ला भाजपवर संशय

‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी अबकारी कर घोटाळाप्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीवरच आता निशाणा साधत गंभीर  आरोप केला आहे. ईडीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नव्या मोबाईलचा पासवर्ड हवा आहे. कारण ईडीच्या आडून भाजपला ‘आप’ची निवडणुकीची रणनीती जाणून घ्यायचीय, असा आतिशी यांनी केला आहे. अतिशी यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी गुरुवारी केजरीवाल यांना न्यायालयाकडून कुठलाच दिलासा मिळानाही. त्यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. आता ‘आप’ नेत्या अतिशी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रिमांडवर न्यायालयात सुनावणी सुरू असताना ईडीच्या वकिलाने नकळत ईडीचा खरा हेतू न्यायालयासमोर ठेवला, अशी टीका आतिशी यांनी केली.

अरविंद केजरीवाल यांना आणखी काही दिवस रिमांडवर ठेवण्याची गरज आहे. कारण केजरीवाल यांनी आम्हाला त्यांच्या फोनचा पासवर्ड सांगितलेला नाही, असे ईडीने म्हटले आहे. तर अरविंद केजरीवाल यांनी काही महिन्यांपूर्वीच नवीन फोन घेतला आहे आणि हे मद्य धोरण 2021-22 मध्ये लागू करण्यात आले. मग त्यानंतर घेतलेल्या फोनमध्ये ईडीला काय बघायचं आहे? ईडीला त्या फोनमधून नेमकं काय हवं आहे, ते आम्हाला स्पष्ट माहित आहे. ईडीच्या माध्यमातून भाजपला ‘आप’ची निवडणुकीची रणनिती  जाणून घ्यायची आहे. आणि त्यासाठी त्या नव्या फोनचा त्यांना पासवर्ड हवा आहे. अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीची रणनीती कशी आखली आहे? कशाप्रकारे प्रत्येक जागेचा सर्व्हे केला आहे? विरोधी पक्षांसोबत युती करून त्यांनी भाजपविरोधात कशी तयारी केली आहे? हे जाणून घ्यायचे आहे, असा हल्लाबोल आतिशी यांनी केला.