संपत्तीवरून कल्याणींच्या घरात कलह…!

भारत फोर्ज कंपनीचे अध्यक्ष बाबा कल्याणी आणि बहीण सुगंधा हिरेमठ यांच्यात कौटुंबिक संपत्तीसाठी वाद सुरू असतानाच आता बाबा कल्याणी यांचा भाचा आणि भाची या दोघांनीसुद्धा या वादात उडी घेतली आहे. फोर्जिंग उद्योगाचे नीलकंठ कल्याणी यांचा नातू समीर हिरेमठ आणि पल्लवी स्वादी यांनी मामा बाबा कल्याणी यांच्याविरोधात पुणे जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली आहे. हे दोघे कौटुंबिक संपत्तीतील 11 टक्के भागीदारी मागत आहेत. यात भारत फोर्ज आणि कल्याणी स्टीलमधील भागीदारीचाही समावेश आहे. कुटुंबातील पाच लोकांविरोधात याचिका दाखल केली आहे. यात समीर हिरेमठ आणि पल्लवी स्वादी यांची आई सुगंधा हिरेमठ, त्यांचा भाऊ गौरीशंकर कल्याणी, त्यांची मुले शीतल कल्याणी आणि विराज कल्याणी तसेच बाबा कल्याणी यांचा मुलगा अमित कल्याणी यांचा समावेश आहे.

N संपत्तीवर केवळ बाबा कल्याणी यांचा एकटय़ाचा अधिकार असूच शकत नाही. बाबा कल्याणी हे कंपन्यांमध्ये मनमानी कारभार करत आहेत, असा आरोपसुद्धा करण्यात आला. यावरून या कुटुंबात मतभेद निर्माण झाले आहेत. 2014 साली वडिलांच्या संपत्तीतील वाटा मिळावा यासाठी बहिणीने कोर्टात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित आहे.

N भारत फोर्ज कंपनीची सुरुवात 1966 मध्ये नीलकंठ कल्याणी यांनी केली. 2013 मध्ये नीलकंठ कल्याणी यांचे निधन झाले. त्यानंतर कंपनीचा सर्व कारभार बाबा कल्याणी यांनी पाहायला सुरुवात केली. या कंपनीला शिखरावर पोहोचवण्यामागे बाबा कल्याणी यांचा खूप मोठा वाटा आहे. भारत फोर्ज कंपनीचे मार्केट कॅप 52 हजार 636 कोटी रुपये आहे. ग्रुपच्या हिकाल कंपनीच्या मालकीवरून याआधीच वाद सुरू आहे.

कौटुंबिक संपत्तीवरून वाद

कल्याणी कन्सल्टन्समध्ये सर्व कुटुंबाची भागीदारी असायला हवी. यात भारत फोर्ज आणि अन्य कंपन्यांचे शेअर्स आहेत. या कंपन्यांचे नियंत्रण केवळ गौरी शंकर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे असणे बेकायदेशीर आहे. कंपनीची स्थापना कल्याणी कुटुंबाच्या संपत्तीतून करण्यात आली. ही सर्व संपत्ती कुटुंबाची संपत्ती आहे. यात सोने आणि दागिने याचाही समावेश आहे. बाबा कल्याणी यांनी सर्व संपत्तीचा खुलासा करावा आणि संपत्तीची विभागणी करावी,अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.