भारतीय नौदलाची ऑण्टिपायरसी मोहीम

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

भारतीय नौदलाच्या समुद्री चाचेविरोधी मोहिमेत 35 समुद्री चाचांना जेरबंद करण्यात आले. या समुद्री चाचांना नौदलाने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. अरबी समुद्रात एमवी रुवन या जहाजाचा वापर करून समुद्री चाचे व्यापारी जहाजांवर कब्जा करत होते. नौदलाने या जहाजावर हल्ला केला. समुद्री चाचांना नौदलाने शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ‘ऑपरेशन संकल्प’ या मोहिमेअंतर्गत भारतीय नौदलाने व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी समुद्री चाचेविरोधी मोहीम हाती घेतली होती.

इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून येमेनमधील हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातून वाहतूक करणाऱया जहाजांवर ड्रोन, क्षेपणास्त्रs आदींच्या सहाय्याने हल्ले सुरू केले. लाल समुद्रातील प्रवास धोकादायक झाल्यामुळे व्यापारी जहाज कंपन्या अन्य मार्गांचा म्हणजे सोमालियाचा किनारा वापरत आहेत.

आता सोमालियाच्या आखातात गेले दशकभर निष्क्रिय असलेल्या समुद्री चाचांनी अचानक डोके वर काढले आहे. मात्र त्यामुळे समुद्री मालवाहतूक अधिकच जिकरीची व धोकादायक झाली आहे. हुथी बंडखोर आणि सोमाली चाचे यांच्यामध्ये थेट संबंध असण्याची शक्यता नाही. मात्र लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी हल्ले सुरू केल्यानंतरच सोमाली चाचे पुन्हा सक्रिय बनले.

आतापर्यंत सोमाली चाचांचा उच्छाद असलेल्या पश्चिमी हिंद महासागरात भारतीय नौदलासह अन्य आंतरराष्ट्रीय नौदलांची गस्त होती. मात्र हुथींच्या हल्ल्यानंतर या नौदलांचे लक्ष येमेनजवळ एडनच्या आखातावर पेंद्रित झाल्यामुळे सोमाली चाचांना रान मोकळे मिळाले. परिणामी गेल्या दशकभरापासून फारशा प्रभावी नसलेल्या चाचांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. हुथी हल्लेखोरांनी जगाचे लक्ष विचलित केल्यामुळे सोमाली चाचांनी चाचेगिरीमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. कारण यातून त्यांना फारसा धोका न पत्करता प्रचंड खंडणी वसूल करता येते.

हुथी बंडखोरांच्या लाल समुद्रातील हल्ल्यांमुळे जागतिक व्यापारावर आधीच गंभीर परिणाम झाला आहे. नोव्हेंबरपासून अपहरणाच्या वीसपेक्षा जास्त घटना घडल्या असून त्यामुळे सुरक्षा व विम्याचा खर्च भरमसाट वाढला आहे. आपली जहाजे सोडवून घेण्यासाठी व्यापारी जहाज पंपन्यांना खंडणीही मोजावी लागत असल्यामुळे खर्चात भर पडली आहे. अनेक व्यापारी जहाज पंपन्यांना लाल समुद्राचा मार्ग टाळून ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घालून जाणारा लांबचा मार्ग निवडावा लागत आहे. त्यामुळे इंधनाचा खर्च 40 टक्के वाढला आहे. त्यातच आता पश्चिमी हिंद महासागरात चाचेगिरीने डोके वर काढल्यामुळे समुद्रातील आंतरराष्ट्रीय व्यापार जगातील देशांकरिता आणि भारताकरिता अजून महाग झाला आहे.

भारतीय नौदलाच्या समुद्री चाचेविरोधी मोहिमेत 35 समुद्री चाचांना 16 मार्च रोजी जेरबंद करण्यात आले होते. या 25 समुद्री चाचांना नौदलाने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. 15 मार्च रोजी नौदलाची ही मोहीम पार पडली होती. अरबी समुद्रात एमवी रुवन या जहाजाचा वापर करून समुद्री चाचे व्यापारी जहाजांवर कब्जा करत होते. नौदलाने या जहाजावर हल्ला केला. समुद्री चाचांना नौदलाने शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ‘ऑपरेशन संकल्प’ या मोहिमेअंतर्गत भारतीय नौदलाने व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी समुद्री चाचेविरोधी मोहीम हाती घेतली होती.

इस्रायल – हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने ‘संकल्प’ अंतर्गत आपल्या सागरी सुरक्षा मोहिमांची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढवली होती. भारतीय नौदलाच्या 100 दिवसांच्या संकल्प मोहिमेचा 23 मार्चला समारोप झाला. डिसेंबर 2023 च्या मध्यावर ही मोहीम सुरू झाली होती. या कालावधीत हिंद महासागरात सागरी सुरक्षेशी संबंधित 18 घटना भारतीय नौदलाने शीघ्र आणि प्रथम प्रतिसाद देत हाताळल्या. 100 दिवसांत नौदलाची जहाजे, विमाने आणि विशेष दलांनी सागरी सुरक्षेसाठी आणि सागरी सेवेत कार्यरत समुदायाचे विविध अपारंपरिक धोक्यांपासून रक्षण केले.

भारतीय नौदलाने 45 भारतीय खलाशांसह,110 पेक्षा जास्त जणांचे प्राण वाचवले, 1000 सागरी कारवाया हाती घेण्यात आल्या, 3000 किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ जप्त केले आणि 450 पेक्षा जास्त व्यापारी जहाजे सुरक्षित राखली. हिंद महासागर क्षेत्रात प्रमुख व्यापारी मार्ग आहेत. तिथून जवळपास एक लाख 20 हजार जहाजे प्रवास करतात. कोणत्याही वेळी या क्षेत्रातील विविध भागांतून सुमारे 13 हजार व्यापारी जहाजे मार्गस्थ होत असतात. सोमालियाची किनारपट्टी चाचेगिरी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा केंद्रबिंदू समजले जाते. 2008 ते 2014 या काळात सोमाली चाचांनी धुमाकूळ घातला होता. आता अद्याप तशी परिस्थिती नसली तरी चाचांचा बंदोबस्त केला नाही तर ही समस्या वाढण्याची भीती आहे. भारतीय नौदल हे अलीकडेच 39 देशांतील नौदलांचा सहभाग असलेल्या (अमेरिकाप्रणीत) ‘संयुक्त सागरी दला’चे म्हणजे ‘सीएमएफ’चे पूर्ण सदस्य बनले आहे.

या आघाडीचा एक भाग म्हणून भारतीय नौदलसुद्धा लाल समुद्राच्या दक्षिण टोकापासून एडनच्या आखातापर्यंत आणि त्यापलीकडे पसरलेल्या समुद्रमार्गापर्यंत सेफ मॅरिटाइम कॉरिडॉर तयार करण्यात मदत करू शकते. भारतासाठी ‘सीएमएफ’ युतीमध्ये सामील होणे हा एक व्यवहार्य पर्याय आहे. कारण भारतीय नौदल सदैव तैनात करणे अत्यंत खर्चिक असेल. म्हणून सोमाली चाचांच्या विरोधात हा पर्याय वापरला जावा, ज्यामुळे आपल्या कमी नौका तैनात होतील आणि तैनातीचा खर्च कमी होईल.

[email protected]