Durg Bus Accident: छत्तीसगडच्या दुर्ग येथे बस खोल खाणीत पडून 15 जणांचा मृत्यू

छत्तीसगड येथील दुर्ग जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास केडिया डिस्टिलरीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन कुम्हारीहून भिलीकडे निघालेली बस 50 फूट खोल खाणीत पडली. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून तर अन्य लोकं जखमी झाली आहेत. सर्वजण एका खासगी कंपनीतील कर्मचारी होते.

दुर्गचे पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी रात्री 8 वाजता कुम्हारी पोलीस ठाण्याजवळील खपरी गावाशेजारी झाला. त्यावेळी एका डिस्टिलरी कंपनीचे कर्मचारी कामावरून घरी परतत होते. प्राथमिक माहितीनुसार, 30 हून अधिक कर्मचारी या बसमध्ये असताना बस रस्त्यावरून घसरली आणि 40 फूट खोल मुरुमाच्या खाणीत पडली. सुरुवातीला या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर आणखी चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

शहर पोलीस अधीक्षक हरीश पाटील यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. बस खाली पडल्यानंतर उलटली आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून जखमींच्या उपचारासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात बस अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. सर्व शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना! जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो हीच प्रार्थना. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, दुर्ग जिल्ह्यातील बस दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी, अशा सदिच्छा व्यक्त करतो. असे लिहीले आहे.