आम्ही ओल्ड, पण आहोत गोल्ड! जोकोविच अन् बोपन्ना या ‘नंबर वन’ खेळाडूंची एकत्रित प्रतिक्रिया

दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड दिल्यास सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर एव्हरेस्टएवढी उंची गाठता येते हे सर्बियाचा नोवाक जोकोविच व हिंदुस्थानचा रोहन बोपन्ना या दोन टेनिसपटूंनी दाखवून दिले. जोकोविच एकेरीत, तर बोपन्ना दुहेरीत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान होणारे टेनिस जगतातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरले आहेत, हे विशेष.

36 वर्षीय नोवाक जोकोविच नुकतेच रॉजर फेडररला मागे टाकत जागतिक क्रमवारीत एकेरीमध्ये अव्वल क्रमांक पटकावणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू होण्याचा बहुमान मिळविला. दुसरीकडे 44 वर्षीय रोहन बोपन्नाही सध्या जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. तोही दुहेरीत अव्वल क्रमांक मिळवणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू आहे. या दोन्ही दिग्गज टेनिसपटूंच्या नावावर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविणारे सर्वात वयस्क खेळाडू असा नवा विश्वविक्रम झाला आहे. याच विक्रमाबद्दल आता जोकोविच आणि बोपन्ना यांनी एकत्र येत ‘आम्ही ओल्ड आहोत, पण गोल्ड आहोत. आमच्याकडे अजून खूप वेळ आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली.

सध्या मोंटे-कार्लो मास्टर्स ही एटीपी टेनिस स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत एकेरीत जोकोविच सहभागी झाला आहे. याचबरोबर बोपन्नाही आपला ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेनसह दुहेरीत सहभागी झाला आहे.

जोकोविचकडून बोपन्नाचे कौतुक

44 वर्षीय बोपन्ना टेनिससारख्या खेळात अजूनही फिट आहे, यावर विश्वासच बसत नाही. खेळासाठी स्वतःला वाहून घेतले की, पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असते. बोपन्नाला मी जिममध्ये तासन्तास घाम गाळताना बघितले आहे. पूर्वीपेक्षाही अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी तो फिजिओसोबत बघायला मिळतो.

 हिंदुस्थानमध्ये येण्यास उत्सुक!

सर्बिया आणि हिंदुस्थानमध्ये अलीकडच्या काळात टेनिस चांगले दिवस आले आहेत. हिंदुस्थानात येऊन टेनिस खेळण्यासाठी मी कमालीचा उत्सुक आहे. हिंदुस्थान हा खूप मोठा प्रचंड लोकसंख्येचा देश आहे. तेथे टेनिसच्या विकासासाठी काम करण्याची माझी इच्छा  आहे. तू (बोपन्ना), महेश भूपती व सानिया मिर्झा आदी खेळाडूंनी हिंदुस्थानी टेनिससाठी बहुमोल योगदान दिले आहे, असेही जोकोविच म्हणाला.