डिलिव्हरी बॉयचे पैसे घेऊन काढायचा पळ

सुटय़ा पैशाचा बहाणा करून गॅस डिलिव्हरी बॉयचे पैसे घेऊन पळणाऱया ठगाला डी. एन. नगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. अब्दुल रशीद खान असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे गॅस डिलिव्हरीचे काम करतात. 9 एप्रिलला ते डी. एन. नगर मेट्रो स्थानक परिसरात गॅस डिलिव्हरीसाठी आले होते. सायंकाळी तेथे एक जण आला. त्याने पाचशे रुपयाच्या दोन नोटा देऊन सुटे पैसे घेतले. काही अंतर गेल्यावर तो पुन्हा त्याच्याजवळ आला. पोस्ट ऑफिसच्या बाजूच्या इमारतीमध्ये आठव्या मजल्यावर गॅसची बुकिंग आहे. तेथे जाऊन गॅस डिलिव्हरी करा. त्यावर विश्वास ठेवून ते त्या इमारतीजवळ गेले. त्याने तक्रारदार यांना पुन्हा थांबवले. 200 रुपये टीप देऊन तुमच्याजवळ असलेले सुटे पैसे मला द्या आणि घरातून 20 हजार रुपयांचे बंडल घेऊन जा अशा भूलथापा मारल्या. आपली आई तुम्हाला 20 हजार रुपयांचे बंडल देईल असे सांगितले. विश्वास बसावा म्हणून त्याने इमारतीखाली आल्यावर पह्न करण्याचा बहाणा केला. 20 हजार रुपयांचे बंडल गॅस डिलिव्हरी बॉयला दे असे भासवले. त्यानंतर ते इमारतीत गॅस सिलिंडर घेऊन गेले. इमारतीचा सुरक्षा रक्षका आणि तक्रारदार हे आठव्या मजल्यावर गेले. तेव्हा तेथे गॅसची बुकिंग नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मचीदर यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक घाडगे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना एका गाडीचा नंबर मिळाला. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. पोलिसांनी गाडीमालकाकडे चौकशी केली. त्यानंतर पोलीस एका गॅरेजमध्ये गेले. तेथे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांनी खानला ताब्यात घेतले.