शिल्पा शेट्टी-राज कुंद्रावर ईडीची कारवाई; जुहूतील फ्लॅट, पुण्यातील बंगल्यासह 98 कोटींची मालमत्ता जप्त

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेती शिल्पा शेट्टी आणि तिचा उद्योजक पती राज कुंद्रा या दाम्पत्यावर सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने Shilpa Shetty आणि Raj Kundra यांची जवळपास 98 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची 97.79 कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती जप्त केली आहे. यात जुहू येथील एका फ्लॅटचाही समावेश आहे. हा फ्लॅट शिल्पा शेट्टी हिच्या नावावर आहे. तर राज कुंद्रा याच्या नावावर असणारा पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेअर्सही ईडीने जप्त केले आहेत.

काय आहे प्रकरण?

2018मध्ये ईडीने बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी राज कुंद्रा याची चौकशी केली होती. लोकांना गुंतवणुकीच्या बदल्यात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून 2 हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला होता. या घोटाळ्यात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची भूमिका काय हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र ईडीने आता संपत्ती जप्त केल्याने दोघांच्या अडचणी वाढल्या आहेत.

2021मध्ये झालेली अटक

दरम्यान, 2021मध्ये अश्लिल चित्रपट प्रकरणात राज कुंद्राचे नाव आले होते. याप्रकरणी त्याला 19 जुलै 2021 रोजी अटकही झाली होती. अश्लिल चित्रपट बनवून ते हॉटशॉट्स नावाच्या अॅपद्वारे प्रदर्शित केल्याचा आरोप राज कुंद्रावर होता. याप्रकरणा तो जवळपास 63 दिवस तुरुंगात होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर तो बराच काळ तोंडावर मास्क लावून फिरायचा