‘मुन्नाभाई’ राजकारणात येणार?…वाचा नेमके काय म्हणाला संजय दत्त….

सध्या लोकसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच आता अनेक अभिनेते, अभिनेत्री राजकारणात प्रवेश करत असून काही पक्षांनीही लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी दिली आहे. आता ‘मुन्नाभाई’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता संजय दत्त राजकारणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत सोशल मिडीयासह अनेक ठिकाणी चर्चा आहेत. आता स्वतः संजय दत्त याने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आपण राजकारणात येणार असून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त सोशल मिडीया आणि इतर ठिकाणी फिरत आहे. मात्र, आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या अफवा आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन संजय दत्तने ट्विटद्वारे केले आहे. सोशल मिडीयावर याबाबत होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आपण आपल्या चाहत्यांना ही माहिती देत आहोत. आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून कोणताही निवडणूक लढवणार नाही, असे संजयने स्पष्ट केले. तसेच आपण ज्यावेळी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेऊ, त्यावेळी आपण स्वतः याबाबतची माहिती देऊ, असेही त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे त्याने म्हटले आहे.

संजय दत्तचे वडील मनमोहन सिंग सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री होते. संजय याची बहीण प्रिया दत्ता या खासदार होत्या. त्यामुळे संजय दत्त याचेही नाव राजकारणाशी जोडले जाते. याआधीही संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र, संजयने आता या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. संजय दत्त तामिळ अॅक्शन थ्रिलर लिओमध्ये दिसला होता. तसेच शाहरुख खानच्या जवानमध्ये त्याची कॅमिओ भूमिका होती. आता तो वेलकम टू द जंगलमध्ये अक्षय कुमार, रवीना टंडन, दिशा पटानी, अरशद वारसी यांच्यासोबत दिसणार आहे.