तडीपार गुंड मिंधे गटात

‘भ्रष्टाचारमुक्त आणि वेगवान प्रशासन’ अशी फसवी जाहिरातबाजी करणाऱया राज्यातील महायुती सरकारमधील घटकपक्षांमध्ये गुन्हेगारांचे प्रवेश वाढत आहेत. नगर जिह्यातून तडीपार केलेला नेवासा तालुक्यातील कुख्यात गुंड नितीन मिरपगार याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिंधे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नगर जिह्यात खळबळ माजली.

दोन दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील काहींनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत मिंधे गटात प्रवेश केला. त्या वेळचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये नगर जिह्यातून तडीपार केलेला गुंड नितीन मिरपगार दिसत आहे. उपजिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने मिरपगार याला नगर जिह्यातून हद्दपार केले असून, सोनई पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिह्यातील वाळूज पोलिसांच्या हवाली केले होते.

प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या आदेशाने गुंड नितीन मिरपगार याला नगर जिह्यातून तडीपार केले आहे. आम्ही त्याला वाळूज पोलिसांकडे हजरही केले आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता.

– सूरज मेढे, पोलीस उपनिरीक्षक, सोनई